

बारामती; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीला जर एकोपा टिकवून ठेवायचा असेल तर शिवसेनेने जवळच्या मित्रपक्षांना स्वतःच्या कोट्यात सामावून घ्यावे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही आपल्या मित्रपक्षांना आपापल्या कोट्याने सामावून घ्यावे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी युती होत आहे, यासंबंधी महाविकास आघाडीत चर्चा झाली का, या प्रश्नावर पवार बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी शेरा मारलेला असला तरी शहानिशा करूनच पुढे कार्यवाही व्हावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. यासंबंधी पवार म्हणाले, मुख्यमंत्री अथवा अन्य मंत्री त्यांच्या जवळच्या आमदारांना खूश ठेवण्यासाठी पॉझिटिव्ह रिमार्क मारतात. त्याची अंमलबजावणी करणे अधिकारी वर्गाला जड जाते. त्यामुळे अधिकारी वर्गालाही थोडे नैराश्य आले होते.
हे कुठे तरी थांबले पाहिजे अशी मागणी होत होती. मग याला पर्याय म्हणून शेरा मारला असला तरी संबंधित सचिव अथवा अधिकार्याने त्याची नीट शहानिशा करावी. चुकीचे काही घडत असेल तर ते निदर्शनास आणून द्यावे. त्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असे ठरले. वास्तविक यामुळे कागदपत्रांची, फाईलची संख्या वाढणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा मंत्र्यांनी ही मागणी तपासून नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असा शेरा मारायला हवा. पण, असे केले जात नाही. आता त्यांचे सरकार आहे. त्यांना वाटेल तसे ते निर्णय घेतात.
सत्ताधार्यांना सत्तेची मस्ती
राज्यात महापुरुषांबद्दल वाचाळवीर काहीही बोलत आहेत, बेताल वक्तव्ये करत आहेत. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदार, खासदारांवर निशाणा साधला. गुणवडी (ता. बारामती) येथे आयोजित विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर ते सभेत बोलत होते.
पवार म्हणाले, राज्यपाल चुकले की एक मंत्री चुकतोय, लगेच दुसरा मंत्री चुकतोय, ते झाले की आमदार चुकतोय, खासदार चुकतोय, असे कसे चुकून चालेल, असेही पवार म्हणाले. मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून मागील वर्षी 850 कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळाला दिले होते. आता ही रक्कम खर्च करण्यासाठी अवघे दोन महिने उरले आहेत. तरीही त्यावर कार्यवाही केली जात नाही. ही रक्कम विकासावर खर्च कधी होणार, असा सवाल पवार यांनी केला.