कॉम्प्युटरच्या माध्यमातून मृत व्यक्तीही राहील ‘जिवंत’!
वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणार्या एका भारतीय कॉम्प्युटर वैज्ञानिकाचे म्हणणे आहे की या वर्षीच्या अखेरपर्यंत मानवी चेतना (ह्युमन कॉन्शियसनेस) कॉम्प्युटरवर अपलोड करता येऊ शकेल. त्यासाठी लोकांनी कुटुंबातील प्रियजनांचे आवाज आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासही त्यांनी सांगितले आहे. डॉ. प्रतीक देसाई नावाच्या या संशोधकाने म्हटले आहे की 2-डी, 3-डी, होलोग्राम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मृत लोकांना पुन्हा 'जिवंत' केले जाऊ शकते. ट्रांस्क्रिप्ट डेटा, न्यू व्हॉईस सिंथेसिस आणि व्हिडीओ मॉडेलच्या मदतीने लवकरच ह्युमन कॉन्शियसनेसला कॉम्प्युटरवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि होलोग्राम तंत्राच्या सहाय्याने मृत व्यक्तीला डिजिटल रूपाने पुनर्जीवित करता येऊ शकते. तसे आपण हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये पाहिले आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीची सर्व माहिती म्हणजे त्याचा आवाज, फोटो, व्हिडीओ 'एआय' सिस्टीममध्ये फीड केले जाईल. त्यामुळे 'एआय' सिस्टीम त्याच्या व्यक्तिमत्त्वाला बारकाईने समजून घेऊ शकेल. त्यानंतर यूजर त्या व्यक्तीसाठी एक त्याच्यासारखीच डिजिटल पर्सनॅलिटी डिझाईन करू शकतो.
अशी हुबेहूब मृत व्यक्तीसारखी दिसणारी डिजिटल व्यक्ती नंतर 'एआय' सिस्टिममध्ये फीड केलेल्या माहितीनुसार यूजरशी बोलू शकेल. डॉ. प्रतीक देसाई यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीमध्ये अनेक 'एआय' स्टार्टअपची स्थापना केली आहे. त्यांनी भारतीय शेतकर्यांच्या मदतीसाठी 'चॅटजीपीटी'प्रमाणे एक चॅटबॉट 'किसान जीपीटी' विकसित केला आहे. सध्या त्यावर काम सुरू आहे.

