ऐतिहासिक स्थळांना मूळ नावे देण्यासाठी ‘नामकरण आयोग’ स्थापन करा; सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसास्थळांची मूळ नावे शोधण्यासाठी आणि त्यांना मूळ नावे देण्यासाठी नामकरण आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.
बहुतांश ऐतिहासिक आणि वारसा स्थळांची नावे विदेशी असल्याचे याचिकेत म्हटले आहे. वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून, केंद्रीय गृहमंत्रालयाला नामकरण आयोग स्थापन करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाने स्थळांची नावे प्रकाशित करावी, अशी मागणीही याचिकेत केली आहे.
भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या आशीवार्दाने पांडवांनी खांडवप्रस्थला इंद्रप्रस्थ (दिल्ली) केले. मात्र दिल्लीतील एकाही रस्त्याला, नगर पालिका वार्ड, गाव अथवा विधानसभा क्षेत्राला कृष्ण, बलराम, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती, द्रौपदी आणि अभिमन्यूचे नाव दिले नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.
अन्य नावेही बदला
मुगल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान असे नामकरण करण्यात आले; मात्र केंद्र सरकारने भारतावर आक्रमक केलेल्यांची नावे न बदलता तशीच ठेवली आहेत. बाबर रोड, हुमायू रोड, अकबर रोड, जहांगिरी, शाहजान रोड, बहादूरशाह जफर रोड ही नावे बदलण्यासाठी सरकारने काहीच केले नसून, हीसुद्धा नावे बदलण्याची मागणी याचिकेत केली आहे.

