

अबुधाबी ; वृत्तसंस्था : जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेले; पण खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येचा सामना करीत असलेल्या इंग्लंडसमोर (ENGvsNZ) टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सातत्याने चांगली कामगिरी करणार्या न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. हा सामना म्हणजे 2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकपचा 'पार्ट-2' समजला जात आहे. यामध्ये विजय मिळवून इंग्लंडचा वचपा काढण्याची संधी न्यूझीलंडला आहे.
इंग्लंड संघाला स्पर्धेपूर्वी जेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जात होते आणि त्यांनी त्यानुसार खेळदेखील केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले. सलामी फलंदाज जेसन रॉय हा दुखापतीमुळे बाहेर गेल्याचा फटका संघाला बसला आहे. रॉय स्पर्धेबाहेर गेल्याने बटलर, जॉनी बेअरस्टोसोबत सलामीला उतरू शकतो. इंग्लंडसाठी बटलर, बेअरस्टो आणि मोईन अली यांची कामगिरी निर्णायक राहिली आहे. सॅम बिलिंग्सला रॉयच्या जागी संघात स्थान मिळू शकते. गोलंदाजीत टायमल मिल्सदेखील दुखापतीमुळे बाहेर गेल्याने संघाच्या चिंतेत भर पडली आहे. मिल्स शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करीत होता. (ENGvsNZ)
मार्क वूडकडे गती आहे; पण मिल्स सारखी विविधता नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवाला मागे टाकत इंग्लंडला नव्याने सुरुवात करावी लागेल. फिरकीपटू मोईन अली आणि आदिल रशीद यांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यांचा प्रयत्न न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा असणार आहे.
न्यूझीलंडकडे निश्चितपणे स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज आहेत ज्यांनी भारताला 110 धावांवर रोखले. अफगाणिस्तान संघालादेखील त्यांच्याविरुद्ध 125 धावांच करता आल्या. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी चांगल्या फॉर्मात असून, त्यांचा सामना करणे सोपे नाही. लॉकी फर्ग्युसनला दुखापत झाल्याने त्यांच्या चिंता वाढल्या होत्या; पण अॅडम मिल्नेने त्याची कमतरता जाणवू दिली नाही. फिरकीपटू ईश सोढी आणि मिचेल सँटेनर यांनी चमक दाखवली आहे. सलामी फलंदाज मार्टिन गुप्टिलने सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि त्याचा साथीदार डॅरेल मिचेल देखील चांगल्या फॉर्मात आहे.
टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला मात देऊ, असा विश्वास न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने व्यक्त केला आहे. 'माझ्या मते आम्हाला आता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला एका चांगल्या संघाचा सामना करायचा आहे. आतापर्यंत आम्ही सर्व खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे, ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.
त्यामुळे हा सामना रोमांचक होईल,' असे ट्रेंट बोल्टने सांगितले. ट्रेंट बोल्ट याने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 2019 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्याचा उल्लेखही केला. 'इंग्लंड संघात सर्वच 'मॅच विनर' खेळाडू आहेत. या वेळेसही ते चांगले खेळत आहेत. आशा आहे की, आम्ही एक मोठा उलटफेर करू शकतो. मागच्या काही वर्षांत दोन्ही संघांचा इतिहास चांगला आहे,' असेही ट्रेंट बोल्ट याने सांगितले.