

मँचेस्टर, वृत्तसंस्था : केव्हिन डे ब्रुएनच्या बहारदार खेळाच्या बळावर मँचेस्टर सिटी संघाने प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत अर्सेनलचा 4-1 अशा फरकाने एकतर्फी फडशा उडवत सनसनाटी निकाल नोंदवला. ही लढत येथील इतिहाद स्टेडियमवर खेळवण्यात आली. पेप गॉर्डियाला यांचे प्रशिक्षण लाभत असलेल्या मँचेस्टर सिटीचा हा अर्सेनलविरुद्ध सलग 12 वा विजय ठरला. या लढतीत ब्रुएनने दोनवेळा तर इर्लिंग हालँड, स्टोन्स यांनी प्रत्येकी एकदा गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला. अर्सेनलचा एकमेव गोल होल्डिंगने 86 व्या मिनिटाला नोंदवला.
प्रारंभी, ब्रुएनने सातव्या मिनिटालाच संघाचे खाते उघडले. हालँडचा पास त्याच्यासाठी निर्णायक ठरला. नंतर जॉन स्टोन्सने स्टॉपेज टाईममध्ये हेडरवरील गोलवर संघाची आघाडी भक्कम केली. यापूर्वी सलग तीन सामने बरोबरीत राहिलेल्या अर्सेनलला येथे मँचेस्टर सिटीची आक्रमणे रोखण्यात अजिबात यश लाभले नाही.
पुढे ब्रुएनने 54 व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल केला. रॉब होल्डिंगने अर्सेनलचा एकमेव गोल केला. पण, तोवर बराच उशीर झाला होता. सिटीचा संघ आता 6 हंगामांत पाचव्यांदा टायटल जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असतील. हालँडने दुसर्या स्टॉपेज टाईममध्ये आणखी एक गोल नोंदवत संघाच्या एकतर्फी आघाडीवर शिक्कामोर्तब केले. हालँडसाठी हा सर्व प्रकारांत हंगामातील 49 वा गोल ठरला.
सलग सात लीग विजय नोंदवणार्या सिटीच्या खात्यावर आता 73 गुण तर अर्सेनलच्या खात्यावर 75 गुण आहेत. पण, सिटीने यासाठी दोन सामने कमी खेळलेले आहेत.