

मँचेस्टर ; वृत्तसंस्था : (England vs India Test) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा व शेवटचा क्रिकेट कसोटी सामना आज शुक्रवारपासून सुरू होत आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. या कसोटीद्वारे भारत इतिहासाच्या उंबरठ्यावर आहे. हा सामना भारताने जिंकला किंवा अनिर्णीत राहिला तर जवळपास 50 वर्षांनंतर भारताला इंग्लंडमध्ये मालिका (England vs India Test) विजयाची नोंद करता येणार आहे.
त्याशिवाय विराट कोहली हा ऑस्ट्रेलिया (2018-19) आणि इंग्लंड (2021) मध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनेल. परंतु, गेल्या चार कसोटी सामन्यांप्रमाणे अंतिम संघाची निवड हा भारतीय संघ व्यवस्थापनेपुढील यक्ष प्रश्न असून, बुमराहचा वर्कलोड आणि अजिंक्य रहाणेचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.
रहाणेला संघात ठेवायचे की नाही याचा विचार संघ व्यवस्थापन करीत असेल. ओव्हलमध्ये फलंदाजीला पूरक असलेल्या खेळपट्टीवरदेखील रहाणेला चमक दाखवता आली नाही. कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे कदाचित कोहली त्याला आणखीन एक संधी देऊ शकतो. त्याला जर संधी मिळाली नाही. तर, सूर्यकुमार यादव किंवा हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
बुमराहने गेल्या महिन्याभरात 151 षटके टाकली आहेत. भारतीय संघासाठी बुमराहचे कार्यभार प्रबंधन चिंतेचा विषय आहे. गेल्या सामन्यात ओली पोपे आणि जॉनी बेअरस्टो यांना बुमराहने अडचणीत आणले. मात्र, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या अनुपस्थितीत कर्णधार कोहलीचा निर्णय महत्त्वाचा असेल. गोलंदाजांना पूरक परिस्थितीमुळे बुमराहला बाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही; पण सहा आठवड्यांनंतर टी-20 विश्वचषक होणार आहे आणि भारतीय संघ त्याच्याबाबत कोणतीच जोखीम घेणार नाही.
गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करणारे उमेश यादव (सहा विकेटस्) आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (तीन विकेटस् आणि 117 धावा) यांना संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. बुमराहला आराम दिल्यास मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. शार्दुलचा फॉर्म पाहता आर. अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे इंग्लंडसाठी मदार कर्णधार ज्यो रूटवर असणार आहे. त्याचा प्रयत्न या सामन्यातदेखील मोठी खेळी करण्याचा असेल. जोस बटलर, जॉनी बेअरस्टोऐवजी संघात खेळू शकतो. तर, मार्क वूड आणि ख्रिस वोक्स नवीन चेंडूने गोलंदाजी करतील.
इंग्लंड : ज्यो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, हसीब हमीद, मोईन अली, जोनी बेअरस्टो, जोस बटलर, डॅन लॉरेंस, ओली रॉबिन्सन, सॅम कुरेन, मार्क वूड, जेम्स अँडरसन, जॅक लीच, ओली पोपे, डेव्हिड मलान, क्रेग मलान.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर.