

पुढारी ऑनलाईन डेस्क : alex hales : वनडे वर्ल्डकपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून ही स्पर्धा भारतीय भूमीवर होत आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. पण त्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला धक्का बसला आहे. 2019 चा वनडे वर्ल्डकप जिंकणा-या या संघाच्या एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. ॲलेक्स हेल्स असे त्याचे नाव आहे.
हेल्सने (alex hales) वयाच्या 34 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्ध झालेला अंतिम सामना हा त्याचा शेवटचा सामना ठरला आहे. आपल्या देशासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे हा बहुमान असल्याचे हेल्सने म्हटले आहे. तो पुढे म्हणतो की, 'मी आयुष्यभरासाठी काही आठवणी बनवल्या आहेत आणि मला वाटते की आता पुढे जाण्याची योग्य वेळ आहे. इंग्लंडच्या जर्सीमध्ये खेळताना मी चढ-उतार पाहिले आहेत. हा एक चांगला प्रवास आहे आणि मला आनंद आहे की इंग्लंडसाठी माझा शेवटचा सामना विश्वचषक फायनल जिंकण्याचा होता. मी फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन.'
पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये खेळण्यासाठी अॅलेक्स हेल्सला (alex hales) या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या टी-20 संघातून वगळण्यात आले होते. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेतही तो खेळला नव्हता. त्यातच आता हेल्सने निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. कारण तो 2024 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडकडून खेळण्याचा प्रबळ दावेदार होता. हेल्सच्या निवृत्तीमुळे टी-20 संघात विल जॅक आणि फिल सॉल्टसारख्या खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे.
अॅलेक्स हेल्स (alex hales) इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला. त्याने 2011 साली इंग्लंडकडून टी-20 सामन्यांत पदार्पण केले. त्याने 11 कसोटीत 573, 70 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2419 आणि 75 टी-20 सामन्यात 2074 धावा केल्या असून तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 7 शतके जमा आहेत.