अभियंता शिंदे यांचा मृत्यु हार्ट अटॅकने; अनियमिततेचा की राजकारणाचा बळी?

अभियंता शिंदे यांचा मृत्यु हार्ट अटॅकने; अनियमिततेचा की राजकारणाचा बळी?
Published on
Updated on

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बापुसाहेब शेषराव शिंदे यांचा हृदयाच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. शवविच्छेदन अहवालानुसार पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी ही माहिती दिली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या निधनाचा अहवाल आला असला तरी ते वाकळवाडी सभामंडप प्रकरणामुळे प्रचंड तणावाखाली होते हे सर्वश्रुत आहे.

याशिवाय ते मृतावस्थेत ज्या ठिकाणी आढळुन आले, तेथे त्यांच्या जाण्याचे कारण, ते स्वतः गेले, त्यांना निमंत्रित केले की आणखी काही या बाबी गुलदस्त्यात आहेत. पोलीस चौकशीतून काही घटनाक्रम समोर येतील. मात्र खेडच्या राजकीय कुरघोडीचा हा शासकीय बळी आहे का? यावर तालुक्यात चर्चा सुरू आहे.

अभियंता शिंदे सोमवारी घरातुन गेल्यावर त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. शोध सुरू असताना मंगळवारी (दि. १४) संध्याकाळी बुट्टेवाडी (ता. खेड) परिसरातील वनविभागात झोपलेल्या अवस्थेत त्यांचे शव मिळुन आले. पोलिसांनी संशयास्पद मृत्यु झाला असल्याची नोंद केली होती. चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले. असे असले तरी वाळकवाडी सभामंडप काम न करता दीड वर्ष अगोदर बिल दिलेले प्रकरण यापाठीमागे असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरु आहे.

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. मागील आठवड्यात राजकीय कुरघोडीचा शिमगा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अभियंता शिंदे यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे तालुकाभर पसरले. मृत्यूच्या कारणांची खातरजमा होण्याआधी पुन्हा एकदा प्रमुख नेत्यांनी शिंदे यांच्या मृत्यूला एकमेकांना जबाबदार धरले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकमेकांना नेहमीप्रमाणे टार्गेट केले. दोन्ही बाजुच्या मागणीनुसार व प्रक्रिया म्हणून अभियंता शिंदे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांना मोबाईलवर बोलून आणलेला दबाव याची निष्पक्षपाती चौकशी करण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.

अभियंता बापुराव शिंदे यांचा मृत्यु ज्या पार्श्वभूमीवर झाला आहे, त्याला हार्ट अटॅक हे कारण नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव, त्यांचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, तालुकाध्यक्ष आणि वाकळवाडीतील त्यांचे समर्थक यांनी शिंदे यांच्या वर प्रचंड दबाव आणला हे तालुक्यातील जनतेला समजले आहे.अधिकाऱ्यांनी त्या दृष्टीने तपस करावा.

                                      – दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड

मृत्यु हार्ट अटॅकने झाला असला तरी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाकळवाडी प्रकरण बाहेर आल्यावर गेल्या आठ ते दहा दिवसांत शिंदे यांना झालेल्या संपर्काची चौकशी प्रामुख्याने करावी असे सांगितले आहे. एकच भ्रष्टाचार उघड झाला. असे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे याद्वारे बाहेर येणार असल्याचे खात्री आहे.

                                 -शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news