अहमदनगर जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नाशिकला रोस्टर तपासणीसाठी गेलेल्या कर्मचार्‍यांच्या कारला नगरकडे परतताना भीषण अपघात झाला. यामध्ये दोघे कर्मचारी जागीच ठार झाले, तर अन्य एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजेनंतर घडली. अशोक परसराम व्यवहारे (वय 56) व विनायक कातोरे (वय 43) अशी मृत कर्मचार्‍यांची नावे आहेत. संतोष लंके हे गंभीर जखमी झाले आहेत. शासनाकडून राज्यात 75 हजार पदभरतीसाठी हालचाली सुरू आहेत. यातील 'पेसा'मधील जागा भरण्यासाठी बिंदुनामावली प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार, नगर जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातून पेसाची बिंदुनामावली तपासणी करण्यासाठी नाशिक आयुक्त कार्यालयातील मागास कक्षात कर्मचार्‍यांना आवश्यक कागदपत्रे घेवून पाठविले जात आहे. शनिवारी पशुसंवर्धन विभागातील कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे, लिपीक संतोष लंके, महिला व बालकल्याण विभागातील वरिष्ठ सहायक विनायक कातोरे हे आपापल्या विभागातील रोस्टर तपासणीसाठी कारमधून नाशिकला गेले होते. नाशिकला शासकीय कामकाज आटोपल्यानंतर ते पुन्हा नगरकडे निघाले होते.

दुर्दैवाने नगर-मनमाड रोडवरील वांबोरी फाट्याजवळ मालवाहू ट्रक व कर्मचार्‍यांच्या कारचा भीषण अपघात झाला. यात व्यवहारे व कातोरे हे दोघे कर्मचारी जागीच ठार झाले. तर वाहन चालविणारे तिसरे कर्मचारी लंके हे गंभीर जखमी झाले. लंके यांच्यावर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची वार्ता समजताच अनेक कर्मचार्‍यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. तर सकाळीही शवविच्छेदनासाठी मृतदेह आणल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांसह कर्मचारी मित्रांनीही हंबरडा फोडल्याचे दिसले.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी सदस्य संदेश कार्ले, जालिंदर वाकचौरे, राजेश परजणे, सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांसह जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन संजय कडूस, शिक्षक संघटनेचे नेते बापूसाहेब तांबे, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाकचौरे आदींसह जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. व्यवहारे यांच्यावर वांबोरी; तर कातोरे यांच्यावर चास कामरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.

साडेसाती संपावी ही अपेक्षा

नगर- मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक व्यवस्था असून, खड्यांचे प्रमाण काहीशा प्रमाणात कमी झाले असले, तरीही रस्त्याच्या अडचणी संपुष्टात आलेल्या नाहीत. वांबोरी फाट्यालगत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एकेरी वाहतूक व्यवस्था, तसेच रस्त्याची दुरवस्था पाहता परिसरात अपघात घडत आहेत. नगर-मनमाड रस्त्याची साडेसाती संपावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगर-मनमाड रस्त्यासाठी तारीख पे तारीख

नगर-मनमाड रस्त्यासाठी कोटी रुपयांचे आकडे सांगत अनेक राजकीय नेत्यांनी वाहवा लुटली. पैसे मंजूर झाल्यानंतर काम सुरू करण्याचे आदेशही झाले. दोनदा निविदा प्रक्रिया होऊनही प्रत्यक्षात; मात्र काम होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. नगर-मनमाड रस्त्याची साडेसाती संपेना व अपघाताच्या घटना असे चित्र असल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news