पुणे : आरोग्यव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : आरोग्यव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'कोरोनाकाळात देशातील आरोग्य व्यवस्था किती तोकडी आहे, हे लक्षात आले. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहे. खासगी हॉस्पिटलची मदत घेऊन डॉक्टरांची संख्या, तसेच हॉस्पिटलसाठी आवश्यक पॅरामेडिकल मनुष्यबळदेखील वाढविण्यात येईल. त्याचबरोबर साडेपाच वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम कमी करता येईल का, याचा विचार सुरू आहे. यातूनच आगामी काळात आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार आहे,' अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दैनिक 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित हेल्थ आयकॉन पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पुण्यातील हॉटेल लेमन ट्री येथे हा कार्यक्रम पार पडला. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. दैनिक 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश इनामदार आणि 'पुढारी' पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'कोरोनाकाळात देशाची दयनीय अवस्था झाली होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मविश्वास दिला. या संकटकाळात विविध सुविधा उपलब्ध करण्यापासून लसनिर्मिती करून नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिली. संपूर्ण जगाने भारताचे नेतृत्व मान्य करण्याचे काही टप्पे आहेत. यात कोरोनाकाळ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. याच संकटकाळात जग भारताकडे अवाक होऊन पाहत होते.'

ते पुढे म्हणाले, की 137 कोटींचा देश असून, त्यात एकही भूकबळी नाही, कोरोनाबाधित आणि मृत्यूचे प्रमाण जगाच्या तुलनेत खूप कमी आहे. एक कोटीपेक्षा कमी लोकसंख्या असलेले साठ देश जगात आहेत. त्या तुलनेत भारतात 137 कोटी लोक आहेत. असे असूनही भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवले, प्रसार रोखला. मृत्यूचे प्रमाण जास्त होऊ दिले नाही. लॉकडाऊनमध्ये माणसे जगविली, या सगळ्यात साथ दिली वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांनी.

यामध्ये वॉर्डबॉय, आया, नर्स, डॉक्टर, पोलिस, बँकातील कर्मचारी, सफाई कामगार यांच्यासह एकूण 18 क्षेत्रांतील लोकांनी सहकार्य केले. यात महत्त्वाचा घटक डॉक्टर आहेत. डॉक्टर जर लपून बसले असते, तर हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आहे, पण ते वापरायचे कसे, औषधे आहेत, पण द्यायची कशी, कोरोना बरा झाला का, हे सांगणार कोण?, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची मदत नसती, तर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नसते, असे नाही. परंतु, खूप हानी झाली असती, असेदेखील पाटील यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय केंद्र तयार करण्याचा विचार
सध्या औद्योगिक कंपन्या एकत्र येऊन ठराविक एखादे काम पैसे देऊन एका केंद्रावर करतात. ज्याठिकाणी कंपन्यासाठी आवश्यक खर्चिक मशिनरी उपलब्ध असतात. ती मशिनरी प्रत्येक कंपनी विकत घेण्याऐवजी त्याठिकाणी आपले काम करून घेते. त्याच धर्तीवर वैद्यकीय क्षेत्रातदेखील एक केंद्र तयार करण्याचा विचार आहे. ज्याठिकाणी वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक सर्व खर्चिक मशिनरी उपलब्ध असतील. रुग्ण तेथे जाऊन कोणत्याही टेस्ट किंवा ऑपरेशन करू शकतील. याचा सर्वच हॉस्पिटलला फायदा होणार आहे.

'पुढारी' वाचल्याशिवाय चहा प्यायचा नाही, हा आमच्या लोकांच्या सवयीचा भाग…
मी कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करतोय. मी कधी मुंबईत, कधी माझ्या गावी, कधी कोल्हापुरात, तर कधी पुण्यात असतो. सगळ्या ठिकाणी 'पुढारी' उपलब्ध आहे. तो वाचल्याशिवाय चहा प्यायचा नाही, हा माझाच नाही, तर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या भागांतील लोकांचा सवयीचा भाग झाला आहे. 'पुढारी' एक दिवस आला नाही, तर तो का आला नाही? याची विचारणा केली जाते. बातम्या पोहोचविणे आणि वेगवेगळ्या विषयांवर भूमिका स्पष्ट करणे, हे काम 'पुढारी' अतिशय परिणामकारकपणे करीत आहे. महाराष्ट्रात सगळी शहरे मिळून अन्य वर्तमानपत्रांच्या तुलनेत 'पुढारी'चा नेहमीच क्रमांक एक राहिला आहे.

आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून 'पुढारी'चे काम : डॉ. योगेश जाधव
दैनिक 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव प्रास्ताविकाच्या भाषणात म्हणाले, 'पुढारी'च्या स्थापनेपासूनच 'पुढारी'ने विविध सामाजिक आंदोलनात मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्याचा लढा असो, गोवा मुक्ती संग्राम असो, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद असो किंवा कोल्हापूर टोलचा प्रश्न असो, या प्रत्येक प्रश्नावर दै.'पुढारी'ने केवळ लिखाण केले नाही, तर वेळोवेळी आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरून सहभाग नोंदवला आहे. 'पुढारी'ने उभारलेले सियाचीनचे हॉस्पिटल तर भारतीय जवानांसाठी एक संजीवनीच ठरली आहे. सियाचीन हॉस्पिटलला जवळपास वीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

या वीस वर्षांत त्यांना ज्या ज्या वेळी गरज भासली त्या त्या वेळी 'पुढारी'मार्फत ती पुरवण्यात आली आहे. मग डॉक्टर, विविध मशिनरी असोत किंवा इलेक्ट्रॉनिक ब्लँकेट, ते पुरवण्यात आले. या वर्षी त्यांना ब्लडबँक सुरू करायची होती. त्यासाठी त्यांना 25 लाखांचा धनादेश सीएसआर फंडातून 'पुढारी'च्या वतीने देण्यात आला आहे. या हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत पाच लाखांहून अधिक जवान उपचार घेऊन बाहेर पडले आहेत. तसेच, गुजरातमधील भूकंप झालेल्या भूज येथेदेखील सुसज्ज रुग्णालय उभारले आहे.

कोरोनाकाळात 'पुढारी'ने फ्रंटलाईन वर्करसोबत काम केले. राज्यात दिव्यांगांसाठी सर्वव्यापी लसीकरण मोहीम 'पुढारी'नेच राबविली. अशा बर्‍याच प्रश्नांत 'पुढारी' नेहमी अग्रेसर असतो. काही दिवसांपूर्वी चंद्रकांतदादांच्याच हस्ते कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात आली. तशीच एक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स पुण्यासाठी देण्यात येणार आहे. 'पुढारी'ची ही बांधिलकी यापुढेदेखील अशीच राहणार आहे, असेही डॉ. योगेश जाधव यांनी सांगितले.

'देवदूतां'ची नोंद इतिहासात सुवर्णाक्षराने होईल
आपण काही वेळा अनेकांच्या त्यागाचा सन्मान करायला विसरतो. क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या लोकांचा सन्मान केला जातो. परंतु, हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रात होताना दिसत नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने 'पुढारी'ने या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. कोरोनाकाळात डॉक्टरांनी आपले जीवन पणाला लावून रुग्णांना जीवनदान दिले. पहिल्या लाटेत डॉक्टर घरी जाऊ शकले नाहीत, तर दुसर्‍या लाटेत पीपीई किटमुळे त्यांना उपाशी राहावे लागत होते.

अशा परिस्थितीत सर्व डॉक्टर रुग्णांना सेवा देत होते. कोरोना काळात अनेक जण फ्रंटलाईनवर काम करीत होते. परंतु, त्यातदेखील डॉक्टर पुढे होते. या त्यांच्या कामाचा गौरव हा झालाच पाहिजे. कोरोनाकाळात डॉक्टरांनी केलेल्या या कामाची नोंद इतिहासात सुवर्णक्षराने लिहिली जाईल. आजच्या कार्यक्रमात डॉ. अविनाश इनामदार यांचादेखील सन्मान केला जाणार आहे. त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी गोरगरिबांसाठी अत्यंत कमी पैशात ससून हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्याचे काम सुरू केले.

त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. ससून हॉस्पिटलच्या सेवेतून निवृत्त होऊन ते स्वत:च्या हॉस्पिटलमधून रुग्णसेवा तर करतच आहेत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीदेखील करीत आहेत. आज आपण डॉक्टरांच्या उत्तुंग कार्याचा सन्मान करीत आहोत. त्यांनी यशाची नवी शिखरे गाठावीत आणि सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुखमय करावे, अशीच इच्छा मी व्यक्त करीत असल्याचेदेखील डॉ. योगेश जाधव यांनी स्पष्ट केले.

या डॉक्टरांना केले सन्मानित
डॉ. भगवान पवार, डॉ. संदीप बुटाला,
डॉ. संदीप अग्रवाल,
डॉ. कुणाल कामठे,
डॉ. ज्ञानेश्वर टेमक आणि डॉ. अर्चना टेमक, डॉ. गणेश ताठे, डॉ. सुमित काकडे, डॉ. पंजाब कथे आणि डॉ. पिंकी कथे,
डॉ. अजितसिंह पाटील, डॉ. सुचेता भालेराव,
डॉ. अपूर्वा जगताप,
डॉ. किरण भालेराव,
डॉ. शुभांगी डुब्बल पाटील, डॉ. रश्मी पाटील, डॉ. अविचल एल. अंबुलकर.

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे जाऊन बसले की प्रश्न सुटतात…
कोल्हापूर शहर आणि परिसरात अशी परिस्थिती आहे, की कुठलाही सामाजिक प्रश्न निर्माण झाला, तर पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे जाऊन बसले की प्रश्न सुटतात. कोल्हापूरचा एक मोठा प्रश्न गाजला. तो म्हणजे कोल्हापूर टोल. कोल्हापूरमध्ये आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी तीस वर्षे टोल घेण्यात येणार होता. जो जवळपास तीन हजार कोटी झाला असता. त्या वेळी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांची सूचना म्हणजेच आदेश असतो. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कोल्हापूरचा टोल बंद झाला.

वेगवेगळ्या आंदोलकांना बळ देण्याचे काम 'पुढारी'कारांनी केले आहे. त्याचबरोबर समाजासाठी सेवा करणे किंवा करणार्‍यांना प्रोत्साहन देण्याची भूमिकादेखील 'पुढारी'ने चोख बजावली आहे. एका वर्तमानपत्राने सियाचीनमध्ये जाऊन हॉस्पिटल बांधण्याचे काय काम? परंतु, त्यांना वाटले की ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. डॉक्टरांना परमेश्वराचे रूप मानले जाते. परंतु कोरोनाकाळात त्यांचे महत्त्व आणखीनच अधोरेखित झाले. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम 'पुढारी'ने आयोजित केला. त्यामुळे 'पुढारी'कार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांचे मी आभार मानतो, असेदेखील पाटील यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news