बाबा, तुम्ही घरी कधी येणार? चिमुकल्याच्या आर्त हाकेने सारेच गहिवरले

बाबा, तुम्ही घरी कधी येणार? चिमुकल्याच्या आर्त हाकेने सारेच गहिवरले
Published on
Updated on

कोल्हापूर : डोळ्यांतून पाण्याच्या धारा ओघळत होत्या… गालावर आलेलं पाणी पदराने पुसत त्यांचा एकमेकांशी संवाद सुरू होता…तो कसा आहे, त्यांची काळजी घे… मी बरा आहे म्हणून सांग त्यांना…. बबन्याकडे लक्ष दे… असा भावनिक संवाद सुरू होता. ये-जा करणारे हा प्रसंग पाहत होते. अन् क्षणात सीपीआरमधून पोलिस व्हॅन निघाली. चिमुकल्याने हाक दिली. 'बाबा तुम्ही घरी कधी येणार' अन् नातेवाईकांसह सीपीआर परिसरातील सारेच गहिवरले.

सीपीआरमध्ये विविध प्रकारच्या कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी आणले जाते. पोलिस स्टेशन, जेलमध्ये नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव असतो. शुक्रवारी दुपारी एक वाजता पोलिस व्हॅनमधून काही कैद्यांना तपासणीसाठी सीपीआर येथे आणले होते. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक थांबले होते. पोलिसांचा व्हॅनजवळ चोख बंदोबस्त होता. कुटुंबातील आपल्या सहकार्‍यांना पाहून नातेवाईकांसह कैद्यांनाही गहिवरले. मी त्यांची काळजी घेते… तुम्ही काळजी घ्या, बाबा मी … आईला दमवत नाही हं…. आईला विचार … असा पोलिस व्हॅनमधूनच त्यांचा एकमेकांशी संवाद सुरू होता.

सीपीआरमध्ये ये-जा करणार्‍यांच्या कानावर हा संवाद पडत असल्याने अनेकजण पोलिस व्हॅनकडे टकमक डोळे लावून हा संवाद ऐकत होते. हृदयाला स्पर्श करणार्‍या भावनिक संवादाने सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. पोलिस व्हॅन निघताच सर्वजण एकमेकांना हातवारे करत होते. क्षणाचा राग डोक्यात घुसतो अन् तुरुंगाची वाट धरायला लावतो. याचा नाहक त्रास अख्ख्या कुटुंबाला सहन करायला लागतो. त्यामुळे सुसंवादाने कोणताही विषय हाताळण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news