

पुढारी ऑनलाइन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी पुण्यातून देण्यात आली आहे. 112 नंबरच्या हेल्पलाईन क्रमांकावर काल मध्यरात्री एक निनावी कॉल आला होता. यावर ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत एकाला पुण्यातील वारजे परिसरातुन अटक केली आहे.
राजेश आगवणे, असे या आरोपीचे नाव आहे.
अचानक उद्भवलेल्या संकटासाठी तातडीने मदत मिळावी म्हणून 112 क्रमांकाचा हेल्पलाइन नंबर आहे. या नंबरवर कॉल केला तर आपल्याला पोलिसांकडून तातडीने मदत उपलब्ध होते. मात्र, या क्रमांकावर मदतीऐवजी आरोपीने धमकी देण्यासाठी कॉल केला. तेही या कॉलचा वापर आरोपीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना जीवे मारण्याच्या धमकीसाठी केला.
पुण्यातील वारजे येथून हा कॉल आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. कॉलवर मी एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना उडवणार आहे. एवढे बोलून समोरील व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत आरोपी राजेशला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशने दारूच्या नशेत ही धमकी दिली.
आरोपी राजेश हा मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्याची पत्नी कोथरूडला खाजगी ठिकाणी काम करते. तो तिला महिन्यातून दोन वेळा भेटायला येतो. त्याच्या पत्नी आणि परिचितांनी त्याच्या दारुच्या व्यसनाबाबत सांगितले आहे. तसेच तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असेही सांगितले.
आरोपी राजेशने काल रात्री प्रथम 112 नंबर वर कॉल करून छातीत दुखत आहे अॅम्ब्युलन्स पाठवा असे कळविले होते. त्याला 108 नंबरवर कॉल करण्यास सांगितले. नंतर त्याने पुन्हा 112 नंबर वर कॉल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो दारुच्या नशेत होता.
हे ही वाचा :