कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ‘ईडी’चे छापे

कोल्हापूर, पुणे, नाशिकमध्ये ‘ईडी’चे छापे
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पुणे, नाशिक आणि कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना दुबईत बसून तब्बल 100 कोटी रुपयांना गंडा घालणारा व्यावसायिक विनोद तुकाराम खुटे आणि त्याच्या साथीदारांवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील पथकांनी गुरुवारी एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे टाकले.

या छाप्यांमध्ये रोख रक्कम, बँक खात्यातील पैसे, मुदत ठेवी आणि दागिने, असा पाच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त केल्याचे 'ईडी'ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर, अजिंक्य बढदे आदी व अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या आरोपींनी शिस्तबद्ध कट रचून 2020 ला गुंतवणुकीची एक बनावट योजना जाहीर केली. गुंतवलेल्या पैशांवर महिन्याला दोन ते तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत या भामट्यांनी गुंतवणूकदारांना भुरळ घातली. याच भामट्यांनी आणखी एक कंपनी कागदोपत्री सुरू करून विदेशी चलनाचा व्यापार जाहीर करत तिथेही प्रचंड परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले.

बोगस गुंतवणूक योजना आणि विदेशी चलनातील गुंतवणुकीसाठी सुरू केलेल्या दोन्ही कंपन्या एक दिवस अचानक बंद केल्या आणि त्यात सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा हवालामार्गे विदेशात पाठवला. यात गुंतवणूकदारांची झालेली फसवणूक ही शंभर कोटी रुपयांच्या घरात आहे.

कोल्हापुरातील अनेकांचे धाबे दणाणले

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या कारणातून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष पथकाने एका व्यावसायिक समूहाच्या उद्यमनगर व उचगाव येथील एजंटावर छापेमारी केल्याच्या वृत्ताने शनिवारी दिवसभर शहरासह जिल्ह्यात उलटसुलट चर्चा होती. कंपनीच्या एजंटाकडील सुमारे 5 कोटी 32 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती उघड होताच फर्मशी संबंधित असलेल्यांचे धाबे दणाणले. या कारवाईबाबत स्थानिक प्रशासन यंत्रणा अनभिज्ञ होती.

कंपनीच्या एजंटांसह साथीदारांनी ट्रेडिंगच्या माध्यमातून दर महिन्याला 3 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील मोठमोठ्या गुंतवणूकदारांना प्रवृत्त केले होते. 2019 पासून संबंधित कंपनीने उलाढाल सुरू केली होती. उचगाव (ता. करवीर) येथील काही मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील एजंट म्हणून कार्यरत होते, अशीही माहिती पुढे येत आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आणि कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांत कंपनीने उलाढालीचा पसारा वाढविला होता. दीडशे कोटींपर्यंत गुंतवणुकीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील भारती पोलिस ठाण्यात याप्रकरणी मे 2023 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 'ईडी'कडून समांतर तपास सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news