

पुढारी ऑनलाईन : तुर्कस्तान आणि सीरियातील शक्तीशाली भूकंपाने शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. बचावकार्यावेळी अर्भकापासून वयोवृद्ध लोकांपर्यंत शकडो नागरिकांना वाचवण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले आहे. दरम्यान, सीरियाच्या वायव्य भागात भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्या खालीच एका चिमुरडीचा जन्म झाला, मात्र तिला जन्म देणाऱ्या आई, वडील आणि भावंडांचा मृत्यू झाला. आता भूकंपाच्या ढिगाऱ्यात जन्मलेल्या नवजात अर्भकाला आता नाव आणि नवीन घरही मिळाले आहे. जगात कोणीच नसलेल्या या अर्भकाचे नाव 'अया' असे ठेवण्यात आले आहे, ज्याचा अरबी भाषेत अर्थ आहे 'चमत्कार' (करिश्मा) असा आहे.
जेव्हा 'अया' ला ढिगाऱ्याखालून काढण्यात आले, तेव्हा तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिची काळजी घेणारे डॉक्टर हानी मारूफ सांगतात, "सोमवारी जेव्हा ती इथे आली तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तिच्या शरीराचे तापमानही खूप कमी होते. तिला श्वास घेता येत नव्हता. या स्थितीत तिचा जगण्याशी संघर्ष सुरू होता.
वजात अर्भकाला वाचवतानाचा व्हिडीओ जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर या मुलीला दत्तक घेण्याची मागणी वाढू लागली. परंतु, रुग्णालयाचे व्यवस्थापक खालिद अत्तिया यांनी सांगितले की, त्यांना जगभरातून 'अया'ला दत्तक घेण्याचे अनेक फोन आले. माझी मुलगी देखील 'अया'पेक्षा फक्त चार महिन्यांनी मोठी आहे. त्यामुळे "मी सध्यातरी तिला दत्तक घेऊ देणार नाही. तिचे दूरचे नातेवाईक परत येईपर्यंत मी माझ्या मुलीप्रमाणे तिची काळजी घेईन" असे त्याने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
आईच्या गर्भात ती सुरक्षित वाढतं होती… धरणी फाटली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. धरणीकंप झाल्यानंतर तिची आई ढिगार्याखाली गाडली गेली.. तिला जन्म दिला आणि आईने आपला प्राण सोडला.. तब्बल ३० तासांनंतर बचाव पथक घटनास्थळी आलं. या पथकाने नाळ तोडून आईचा मृतदेह ढीगार्याखालून काढला आणि जखमी नवजात बालिकेला रुग्णालयात दाखल केले..माय-लेकींच्या जीवनातील जन्म-मृत्यूचा ह्दयद्रावक योगायोग सीरियामध्ये घडला आहे. तब्बल ३० तास मृत्यूशी झूंज देत भूकंपालाही पूरन उरलेल्या बालिका जगभरातील चर्चेचा विषय ठरली होती.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शक्तीशाली भूकंपानंतर सीरियातील जिंदेरेस शहरात राहणार्या ३४ वर्षीय गर्भवती खलील अल शमी ढिगार्याखाली गाडल्या गेल्या. दोनच दिवसांमध्ये त्यांची प्रसूती होणार होती. त्या आपल्या भावाच्या घरी राहत होत्या. भूकंपात घर उद्ध्वस्त झाले. काही क्षणात घराचे ढिगार्यात रुपांतर झाले. बचाव पथक आले. ढिगारा उपसत असताना त्यांना एक गोंडस मुलगी दिसली. खलील शमी यांची प्रसूती झाल्याचे दिसले, मात्र ढिगार्याखाली दबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. बचाव पथकाने नाळ कापली आणि तब्बल ३० तासांहून अधिक काळ नवजात बालिकेला रुग्णालयात दाखल केले. माय-लेकींच्या जीवनातील जन्म-मृत्यूचा ह्दयद्रावक योगायोगाने प्रत्येक संवेदनशील व्यक्ती हळहळला होता.