

शिरोळ, पुढारी वृत्तसेवा
उसाच्या फडातून ओव्हरलोड भरलेली बैलगाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्याची जबाबदारी असताना कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांना पदरच्या पैशातून बैलगाड्या बाहेर काढण्यास भाग पाडत आहे. या विरोधात आंदोलन अंकुश शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनावेळी कारखाना समर्थक, पोलीस आणि शेतकरी आंदोलक यांच्यात शाब्दिक वादावादी, शिवीगाळ, तसेच झटापट झाली.
याप्रसंगी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे हात, पाय धरून त्यांना फरफटत ओढत नेले. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी ज्या पद्धतीने आमच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल केले. त्याच पद्धतीने ट्रॅक्टर-ट्रक-बैलगाडी अशा ओव्हरलोड वाहनांबरोबर कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी व वाहनधारक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी धनाजी चुडमुंगे यांनी आंदोलनावेळी केली.
त्याच बरोबर पोलिस व कारखाना समर्थकांना हाताशी धरून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला. पोलीस ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना साखर कायदा समजावून सांगतात. त्याच पद्धतीने कारखानदारांनाही समजावून सांगावा अशी उपरोधात्मक मागणी आंदोलकांनी केली.
साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या एकूण एफआरपीतून तोडणी व वाहतुकीचा खर्च घेतला आहे. तरीही ऊस फडातील बैलगाड्या शेतकऱ्यांना इतर वाहनाने बाहेर काढावे लागतात. यासाठी प्रति एकरी पाच हजार रुपये खर्च येत आहे. वास्तविक पाहता ऊस तोडणी वाहतूक खर्च घेतल्यामुळे ही जबाबदारी साखर कारखान्याची आहे. त्यामुळे कारखान्याने फडातून बैलगाडी बाहेर काढावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु या मागणीची दखल घेण्यात आली नाही.
याविरोधात शेतकऱ्यांनी येथील टेम्पो आड्डा ते छत्रपती शिवाजी चौक या दरम्यान ऊस वाहतूक रोखून आंदोलन केले. आंदोलनाच्या सुरुवातीलाच कारखाना समर्थक आंदोलकांशी आमने-सामने भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.
बैलगाडीत पहिल्यांदाच एक ते दिड टन ऊस
आंदोलन अंकुशने ऊस रोखण्याचे आंदोलन करण्याचे घोषित केल्यानंतर कारखानदारांनी सर्व बैलगाडी धारकांना एक टनापेक्षा जास्त गाडी भरण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी प्रथमच सर्व गाड्या एक ते दोन टनाच्या भरल्याचे दिसत होते. सदरच्या सर्व गाड्या पोलिस बंदोबस्तात कारखान्यावर पोचवण्यात आल्या.
हेही वाचा