कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर येतंय संकट; त्यांची विष्ठा ठरतेय स्वास्थ्यासाठी हानिकारक

कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर येतंय संकट; त्यांची विष्ठा ठरतेय स्वास्थ्यासाठी हानिकारक
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवडमध्येही कबूतर हा पक्षी मोठ्या संख्येने आढळून येत आहे. शहरातील काही भागांमध्ये कबुतरांना अनेक नागरिक दाणे खायला घालतात. त्यामुळे येथे त्यांचा अधिवास तयार होतो. मात्र, या कबुतरांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते. कबुतरांपासून सामान्यांना होणारा संसर्ग वाढलाय. लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्याने या कबूतरखान्यांवर नियंत्रण आणायला हवे. 2019 मध्ये, यूकेच्या ग्लास्को हॉस्पिटलमध्ये कबुतरांच्या विष्ठेतून झालेल्या संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कबुतरांच्या विष्ठेतून बुरशी पसरते?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी आढळून येते. कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीत ही बुरशी सापडते. याबाबत पुण्याचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. विजय वरद यांनी त्यांच्या अभ्यासात नोंद केली आहे. 'कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमादेखील होण्याची शक्यता असते.'

आजार कसा होतो?
श्वसनविकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांची विष्ठा ही वाळल्यावर त्याची भुकटी तयार होते. ती हवेत मिसळून श्वासातून शरीरात गेल्यानंतर लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो. ग्लास्को हॉस्पिटलमध्ये झालेल्या मुलाच्या मृत्यूच्या कारणाचा अभ्यास करताना तज्ज्ञांना, कबुतरांच्या विष्ठेचे काही कण रुममध्ये आढळून आले. स्कॉटलँडचे आरोग्य सचिव जेन फ्रीमन यांनी हे 'हे कण डोळ्यांना दिसू शकत नव्हते', असे सांगितले.

हे किती जोखमीचं आहे?
'अनेकांना याचा त्रास होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना फुफ्फुसात संसर्ग होतो.' क्रायटोकॉकसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला होत नाही.

पुण्यात कबुतरांच्या विष्ठेची समस्या
पुण्यात कबुतराची संख्या नक्की किती आहे, हे ज्ञात नाही. पण पाळीव कबुतरांची संख्या लाखांच्या घरात असेल. तर त्यांच्या विष्ठेची समस्या मोठी होऊ शकते. कबुतरांच्या विष्ठमुळे मुंबईत दोन महिलांची फुफ्फुसं निकामी झाल्याची बातमी जानेवारी 2020 मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. मुंबईतील छातीविकारतज्ज्ञांनी या दोन्ही महिलांना हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया किंवा पर्यावरणामुळे फुफ्फुसं निकामी झाल्याची माहिती दिली होती.

मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होतो संसर्ग
कबुतरांची विष्ठा आणि पखांमुळे होणार्या आजारांबाबत डॉ. वरद यांनी अभ्यास केला होता. संशोधनातून काय आढळून आलं? पुणे आणि आसपासच्या परिसरातील 5 ते 12 वर्ष वयोगटातील 1100 मुलांवर अभ्यास केला. 37 टक्के मुलांना कबुतरांच्या विष्ठेतून पसरणार्या बुरशीमुळे अ‍ॅलर्जी झाली. 39 टक्के मुलांना पंखामुळे अ‍ॅलर्जी झाल्याचं समोर आले आहे. 'कबुतरांमुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांनी कबुतरांना अन्न देऊ नये', अशी सूचना पुणे महापालिकेनेही आपल्या पर्यावरण अहवालात केल्याची डॉ. वरद यांनी नोंद केली आहे.

कबूतर आ आ…
कबुतरांचा नैसर्गिक अधिवास हा आपण माणसांनी हिसकावून घेतला आहे. आपण त्यांना भरपूर दाणे टाकतो, काही ठिकाणी तर पोतीच्या पोती धान्य टाकले जाते. त्यामुळे ही कबूतर मोठ्या प्रमाणावर त्याठिकाणी जमा होतात. त्यामुळे त्या परिसरात ते विष्ठाही टाकतात. त्यांच्या सततच्या वावरामुळे संपर्क आल्याने माणसे विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आले की त्यांना श्वसनाचा त्रास, अ‍ॅलर्जीचा त्रास होतो.

कोणते आजार होतात…

  • कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची अ‍ॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
  • हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया.
  • श्वासनलिकेला सूज येणं.
  • फुफ्फुसांना सूज येणं.
  • क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. (श्वसनमार्गाचे गंभीर आजार)

विष्ठा किती धोकादायक?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील कण हवेत मिसळतात. ही प्रदूषित हवा श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास किंवा प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. पक्षांच्या विष्ठेमध्ये असलेल्या सॅलमोनेला या जीवाणूंमुळे डायरिया होण्याची शक्यता असते.

काळजी घ्या…

  • पक्षांच्या विष्ठेशी संपर्क झाल्यास खबरदारी घेणं गरजेचं आहे.
  • खाण्यापूर्वी, हात तोंडाजवळ नेताना त्वचा स्वच्छ करणं गरजेचं आहे.
  • पक्ष्यांना दाणे दिल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
  • रोगप्रतिकारशक्ती कमी असेल किंवा एचआयव्हीसारखा आजार असल्यास पक्षांची विष्ठा स्वच्छ करू नये.

कबूतर हा पक्षी शांतिदूत म्हणून ओळखला जातो. पण वने, झाडेझुडपे कमी होऊन सिमेंट काँक्रीटच्या इमारती वाढल्यामुळे त्यांचा नैसगिक अधिवास आपण हिरावून घेतला आहे. त्यामुळे ते इमारतीच्या डकमध्ये, इमारतीच्या कानाकोपर्यात आश्रयाला येतात. तसेच आपण त्यांना भरपूर खायला घालून त्यांची प्रजनन शक्ती वाढवतो. पर्यायाने त्यांची संख्या वाढते. गल्लोगल्ली झाडे वाढवून आणि त्यांना दाणा गरजेपुरता घालून नैसर्गिक घर मिळवून द्या, म्हणजे हा शांतिदूत पक्षी मानवी आरोग्यासाठी घातक बनणार नाही.

उमेश वाघेला, पक्षीमित्र.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news