

कोल्हापूर ; सागर यादव : मकर संक्रांतीचा सण होतो न होतो तोच बालचमूंसह तरुण आणि ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकालाच पतंगाच्या खेळाचे वेध लागतात. मात्र, मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांचे पतंगासारख्या खेळाकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा थेट परिणाम पतंग व्यवसायावरही झालेला दिसतो. पतंगाची विक्री अर्ध्यावर आली असून उलाढालही कमी झाली आहे.
यापूर्वी मकर संक्रांतीपासून पतंग उडविण्याच्या खेळाला उधाण यायचे. यामुळे संक्रांतीनंतर पावसाळा सुरू होईपर्यंत उंच आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसायचे. कालौघात यात मोठे बदल झाले आहेत. याचे कारण पतंगाचे आकर्षण असणारी मुले आता मोबाईलमधील गेम्समध्ये गुंतली आहेत. यामुळे साहजिकच पतंग उडवण्याचा उत्साहही मावळला आहे.
अबालवृद्ध, तरुण आणि ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण मोबाईल घेऊन एकलकोंडेपणे बसलेले दिसू लागले आहेत. साहजिकच याचा परिणाम एकूणच पतंग विक्रीवर झाला आहे. पतंगांची विक्री जवळपास निम्म्यावर आली आहे. पतंग, दोरा यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याने बाजारातील उलाढालही कमी झाली आहे.
पतंगांचा डेकोरेशनसाठी वापर…
पतंगांचा वापर उडविण्यापेक्षा इतर कारणांसाठी होऊ लागला आहे. पतंग महोत्सव, डोकोरेशन, वाढदिवस, बोरन्हान, विविध प्रकारच्या इव्हेंट व तत्सम कार्यक्रमांसाठी किंवा घराच्या सुशोभीकरणासाठी पतंगांची विक्री होऊ लागली आहे.
बाजारपेठेत पतंगांची विविधता…
मुलांच्या आवडी-निवडी विचारात घेऊन बाजारात पतंगांची विविधता पाहायला मिळत आहे. पेपर, मेटल, फ्लोरोसंट यासह कार्टूनच्या प्रकारातील पतंगांची निर्मिती करण्यात आली आहे. अगदी 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे व लहान-मध्यम व मोठे अशा आकाराचे पतंग बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय चायनीज दोर्यावर बंदी असल्याने 10 नंबरच्या रंगीत दोर्याचा वापर पतंग उडविण्यासाठी होऊ लागला आहे. 10 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत दोर्याच्या रिंगीची किंमत आहे.
विविध कारणांनी पतंग बदनाम…
धोकादायक मांजा दोरा यासह विविध कारणांनी पतंगाचा खेळ बदनाम झाला आहे. पतंगा च्या मांजाने गळा चिरल्याच्या दुर्घटना दरवर्षी घडतात. अडकलेला पतंग काढताना उंच इमारत व झाडावरून पडणे, शॉक लागणे, पतंग पकडताना वाहनांना धडकणे असे अपघाताचे प्रकारही वारंवार घडले आहेत.
शिवाय पतंगांच्या काटाकाटीमुळे नाहक ईर्ष्या निर्माण होत असल्याने यातून हाणामार्या, खून, पतंग पकडतानाच्या धावपळीतून अपघात अशा दुर्घटना घडल्या आहेत. मांजा दोर्यावर बंदी असतानाही काही मुलांकडून काच, रांगोळी, फेवीकॉल यांचा वापर करून मांजा दोर्याची निर्मिती केली जाते. यामुळे माणसाबरोबर निसर्गातील प्राणी, पक्षी, वनस्पती यांनाही इजा होऊ शकते. वास्तविक सर्वप्रकारची काळजी घेऊन इतर खेळांप्रमाणेच पतंगाच्या खेळाचाही सुरक्षितपणे आनंद लुटणे शक्य आहे.