Dubai flood news | दुबईच्या वाळवंटात पावसाचा कहर, विमानतळ पाण्यात बुडाला, शेजारील ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू

Dubai flood news | दुबईच्या वाळवंटात पावसाचा कहर, विमानतळ पाण्यात बुडाला, शेजारील ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबईत पावसाने हाहाकार उडाला आहे. दुबईत मंगळवारी वर्षभराचा पाऊस एका दिवसात पडला. यामुळे संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी पाण्याखाली गेली. हा परिसर समुद्रासारखा दिसत होता. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. घरे पाण्याखाली गेली. विमानतळावरील पूरस्थितीमुळे जवळपास अर्धा तास विमानसेवा ठप्प झाली होती. दरम्यान, दुबई शेजारच्या ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या अचानक पुरामुळे किमान १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. (Dubai flood news)

दुबई विमानतळावर मंगळवारी अवघ्या १२ तासांत सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासांत एकूण १६० मिमी पाऊस झाला. दुबई शहरात एका वर्षात सरासरी ८८.९ मिमी पाऊस पडतो. पण याहून अधिक एका दिवसात पाऊस बरसला. यामुळे लोकांची तारांबळ उडाली.

बुधवारी सकाळी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवाशांसाठी सूचना जारी करत "तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा आणि विमानतळावर प्रवासासाठी महत्त्वपूर्ण अतिरिक्त वेळ द्यावी" असे सांगितले.

दुबई विमानळावरील धावपट्टी पाण्याखाली गेल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

दुबई वेबसाइटने मंगळवारी भारत, पाकिस्तान, सौदी आणि ब्रिटनकडे जाणाऱ्या डझनभर विमान उड्डाणांना विलंब किंवा ती रद्द केल्याचे दर्शवले होते.

एमिरेट्स एअरलाइनने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की प्रतिकूल हवामानाचा परिणाम म्हणून अनेक उड्डाणांना उशीर झाला अथवा ती रद्द करण्यात आली.

मंगळवारी सकाळी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) राष्ट्रीय हवामान केंद्राने दुबई, अबू धाबी आणि शारजाहसह देशातील मोठ्या भागांसाठी हवामानाचा इशारा जारी केला होता. दुबई पोलिसांनी अचानक आलेल्या पुरामुळे शहरातील काही रस्त्यावरून न जाण्याचा सल्लाही जारी केला होता. (Dubai flood news)

दुबईत पूर, क्लाउड सीडिंगचा परिणाम?

दुबई आणि यूएईच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस हा काही अंशी क्लाउड सीडिंगमुळे पडला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि कोरड्या प्रदेशांपैकी एक आहे. या प्रदेशात सरासरी वार्षिक १०० मिलिमीटर (३.९ इंच) पेक्षा कमी पाऊस पडतो. यामुळे पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी येथे क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानचा वापर केला जातो. वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करणे हे या तंत्रज्ञानाच्या उपयोजनाचे मुख्य उद्दिष्टहे आहे. यूएई व्यतिरिक्त, सौदी अरेबिया आणि ओमानसह या गल्फ प्रदेशातील इतर देश त्यांच्या देशांमध्ये पर्जन्यवृष्टी वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंगचा वापर करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news