

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा मताधिक्याने विजय झाला. विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा त्यांनी पराभव केला. देशात त्यामुळे प्रथमच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती लाभल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत भाजपप्रणित रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. मतमोजणीमध्ये द्रौपदी मुर्मू यांना मते प्राप्त झाली तर सिन्हा यांना एवढी मते मिळाली.
द्रौपदी मुर्मू यांच्या शानदार विजयाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी अभिनंदन करण्यासाठी दाखल झाले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या संचालनाची जबाबदारी असलेले केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सी.टी.रवी आणि अन्य नेते उपस्थित होते.
पहिल्या फेरीत खासदारांकडून करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत मुर्मु यांना ५४० मते मिळाली. त्यांना मिळालेल्या मताचे मूल्य ३ लाख ७८ हजार एवढे होते. तर, यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली. त्यांच्या मताचे मूल्य १ लाख ४५ हजार एवढे होते. एकुण ७४८ मते वैध ठरली तर १५ मते बाद ठरवण्यात आली. एकूण वैध मतांचे मूल्य ५ लाख २३ हजार ६०० एवढे होते. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीअंती रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना एकूण १ हजार ३४९ मते मिळाली. त्यांच्या मिळालेल्या मतांचे मूल्य ४ लाख ८३ हजार २९९ एवढे होते. तर, यशवंत सिन्हा यांना एकूण ५३७ मते मिळाली. सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मूल्य १ लाख ८९ हजार ८७६ एवढे होते. दुसर्या फेरीच्या मतमोजणीमध्ये वर्णक्रमाप्रमाणे १० राज्यांमधील मतांची मोजणी झाली. या १० राज्यांमध्ये मुर्मू यांना ८०९ तर सिन्हा यांना ३२९ मते मिळाली. तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीअंती मुर्मू यांना एकुण २ हजार १६१ मते मिळाली. त्यांचे मूल्य ५ लाख ७७ हजार ७७७ एवढे होते. यशवंत सिन्हा यांना तिसऱ्या फेरीअंती १ हजार ५८ मते मिळाली, त्याचे मूल्य २ लाख ६१ हजार ६२ एवढे होते.
तिसऱ्या फेरीत वर्णक्रमानुसार कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मेघालय, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम. नागालँड, ओदिशा आणि पंजाब या राज्यांमधील मते मोजण्यात आली. यामध्ये एकुण १३३३ मतांपैकी मुर्मू यांना ८१२ (९४,४७८) तर सिन्हा यांना ५२१ (७१,१८६) मते मिळाली.
अमृतमहोत्सवात रचला इतिहास-नरेंद्र मोदी
देशाची १३० कोटी जनता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाने इतिहास रचला आहे. अतिशय दुर्गम भागात जन्मलेली आदिवासी समुदायातील भारताची कन्या देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाली आहे. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचा सेवाभाव आणि यश हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे अवघे जीवन हे देशातील नागरिकांसाठी विशेषतः गरीब, उपेक्षित आणि दलितांसाठी ती आशेचा किरण आहे.
आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी विजय मैलाचा दगड-अमित शाह
आदिवासी कुटुंबातून आलेल्या रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड हा संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे, मी त्यांचे अभिनंदन करतो. अंत्योदयाचा संकल्प आणि आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा विजय म्हणजे मैलाचा दगड आहे. द्रौपदी मुर्मू अतिशय परिस्थितीशी लढून देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्या आहेत. ही बाब आपल्या लोकशाहीची शक्ती दर्शवते. संघर्षानंतरही त्यांनी ज्या निःस्वार्थ भावनेने देश आणि समाजाच्या सेवेत स्वत:ला वाहून घेतले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ अतिशय अभिमानास्पद ठरेल.
देशासाठी अभिमानाचा क्षण-जे.पी.नड्डा
द्रौपदी मुर्मू जी यांची देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. वनवासी समाजातील महिला राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणे हा देशासाठी एक सुवर्ण क्षण आहे. त्यांचे कौशल्य आणि प्रशासकीय आणि सामाजिक कार्यातील अनुभवाचा देशाला खूप मोठा फायदा होईल. द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्रपतीपदी विराजमान होणे हे अंत्योदयाचे लक्ष्य घेऊन सामाजिक परिवर्तनाद्वारे राष्ट्रनिर्माणासाठी कार्यरत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हे सर्व वर्गांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याटचे द्योतक आहे.