डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेत आदर्श निर्माण केला : गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे गौरवोद्गार

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेत आदर्श निर्माण केला : गुरूदेव श्री श्री रविशंकर यांचे गौरवोद्गार
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकारितेतील आदर्श निर्माण केला आहे. पत्रकारांनी कसे असावे, काळानुरूप कोणते बदल करावेत, त्याचबरोबर काळाच्याही पुढे जाण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत, याची जाण त्यांना असल्याचे गौरवोद्गार विख्यात गुरुदेव आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी शनिवारी काढले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने डॉ. जाधव यांना रविशंकर यांच्या हस्ते 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी संसद, प्रशासन आणि न्यायपालिका या तीन खांबांप्रमाणेच माध्यमांचा चौथा खांब असून, तिन्ही खांबांमध्ये सामंजस्य ठेवण्याची माध्यमांची जबाबदारी आहे, तसेच लोकशाहीला सध्या चांगल्या पत्रकारितेची अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पुरस्काराला उत्तर देताना डॉ. जाधव यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने धार्मिक, औद्योगिक, कला, पत्रकारिता, शिक्षण आदी क्षेत्रांतील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, 'न्यूज 18 लोकमत'चे संपादक आशुतोष पाटील, दै. 'सकाळ'चे संचालक-संपादक श्रीराम पवार, 'एस. एन. बी. पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट'चे संस्थापक डी. के. भोसले, भारती इन्स्टिट्यूटचे संस्थापक रवींद्र भारती, अभिनेता स्वप्नील जोशी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

श्री श्री रविशंकर म्हणाले की, माध्यमांचे काम केवळ लोकांच्या उणिवा दाखविणे नाही, तर चांगल्या लोकांना शोधून त्यांना सन्मानित करणे हेदेखील आहे. लोकांना आरसा दाखविणे, हे पत्रकारांचे आद्य कर्तव्य आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रेरणा देणेदेखील गरजेचे आहे. लोकांना आशेचा किरण दाखविणे, ही पत्रकारितेची एक विशेषत: आहे. वस्तुस्थिती दाखविणे आणि लोकांना आशेचा किरण दाखवीत समाजाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणे, हे काम पत्रकारितेचे करणे अपेक्षित असते.

लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. सरकार, न्यायालय, पत्रकारिता आणि उद्योग-व्यापार आणि यांना जोडणारे एक धार्मिक क्षेत्र आहे. हे सगळे वेगवेगळे असणे गरजेचे आहे. नाही तर लोकशाही नेस्तनाबूत होईल. लोकशाही टिकवायची असेल, तर हे स्तंभ वेगवेगळे असणे गरजेचे आहे. तरच लोकशाही टिकेल. या सगळ्या स्तंभांची आवश्यकता आणि त्यांच्यातील अंतरदेखील गरजेचे आहे. त्यांना जोडणारे महत्त्वाचे अध्यात्म क्षेत्र आहे. जिथे अध्यात्म असेल, तिथे राजकारणही चांगले होईल, न्यायव्यवस्थादेखील चांगली असेल. कारण लोक तणावमुक्त वातावरणातच काम करू शकतात. पत्रकारांच्या जीवनात ताणतणाव फार असतो. कारण त्यांना वेळेचे बंधन असते. वेळेचे बंधन आले की ताण वाढतो आणि ताणतणावातून मुक्त होण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता असते. जीवनात निर्भयता, कुणाशी वैर न ठेवणे, समानता, समता म्हणजेच तर अध्यात्म आहे.

जीवनात तीन गोष्टींना महत्त्व आहे. मनात स्पष्टता, हृदयात शुद्धता आणि जीवनात प्रामाणिकता, हे पत्रकारितेतील आदर्श आहेत. हेच आदर्श राज्यकर्ते आणि न्यायव्यवस्थेसाठीही आहेत. आजच्या काळात लोक एकमेकांपासून दूर चालले आहेत. त्यामुळे स्थानिक भाषेतील माध्यमांनी त्यांना एकत्रित आणण्यासाठी कार्य करायला हवे. आज विविध क्षेत्रांतील नामवंतांचा सन्मान करण्यात आला. अशांचा सन्मान केल्यास आपलादेखील सन्मान वाढत असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा देखील सन्मान वाढला आहे, असेही रविशंकर यांनी सांगितले.

समाजाचे चांगले व्हावे, कुणाला दु:ख होऊ नये, सगळे आनंदी असावेत, दुसर्‍यांच्या दु:खाने दु:खी होणे, हे मानवतेचे लक्षण आहे. ही मानवता देशाच्या प्रत्येक गावात उपलब्ध आहे. ही मानवता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. राज्यकर्ते, पत्रकार, उद्योगपती यांनी समाजाच्या प्रगतीसाठीच काम करायला हवे. भाषेचा आपल्याला गर्व असायला हवा. हा संपूर्ण संसार ईश्वराचा आहे. येथील कणाकणात ईश्वराचा अंश आहे. त्याला ओळखणे हेच अध्यात्म आहे. ईश्वराला ओळखल्यानंतर जीवनात ताणतणावापासून दूर राहता येते. जीवनात काहीच कमी पडत नाही, असेदेखील रविशंकर यांनी स्पष्ट केले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, अभिनेता स्वप्नील जोशी, सीटीआरचे उपाध्यक्ष अनिल कुमार, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा, इंदुबेन शहा कॅन्सर पेन रीलिफ सेंटरचे प्रकाश शहा आणि उम्मीद फाउंडेशनचे अनुप मेहता, भगवती सोशल ग्रुपचे बाबासाहेब औटी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे बबन दहिफळे, मिलिंद कुलकर्णी, एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक निलेख खेडेकर, सामाजिक कार्यकर्ते किरण दाभाडे, चैतन्य धोका आणि नीलम धोका, एस. एन. बी. पी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डी. के. भोसले, भारती इन्स्टिट्यूटचे संस्थापक रवींद्र भारती, 'न्यूज 18 लोकमत'चे संपादक आशुतोष पाटील, दै. 'सकाळ'चे संचालक-संपादक श्रीराम पवार यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागत किरण जोशी यांनी केले. प्रास्ताविक संजय भोकरे यांनी केले. मधुराणी गोखले- प्रभुलकर यांनी गणेशवंदना आणि गुरुवंदना सादर केली. सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news