

टी-२०वर्ल्डकपमध्ये भारताने आपला पहिलाच सामना पाकिस्तानकडून हरल्याने सेमीफायनलमधील मार्ग अधिक खडतर झाला आहे. उद्या (दि.३१) न्यूझीलंडबरोबर भारताचा सामना होणार आहे. दरम्यान, मागच्या दोन महिन्यांपूर्वी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात जार्वो नामक एका व्यक्तीने भारतीय संघाला जोरदार पाठिंबा दिला होता. या मालिकेचा अजुन निकाल लागला नसला तरी मालिकेत आघाडीवर आहे. कोरोना संसर्गामुळे पाचवा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. (T20 WC jarvo)
भारतीय टीमला जोरदार पाठिंबा देणारा जार्वो पुन्हा एकदा भारतीय टीमच्या मागे धावून आला आहे. भारत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी जार्वोने एक ट्वीट केले. टी-२० विश्वचषकासाठी भारताला माझी गरज आहे का? माझे पूर्ण किट तयार आहे", असे तो या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.
भारत आणि इंग्लड यांच्यातील कसोटी सामन्यावेळी जार्वो सर्वांच्या समोर आला. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव ३४ वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी जार्वो एकदम मैदानात आला आणि एकच गोंधळ उडाला होता. जार्वो मैदानातून पळत येत थेट जॉनी बेअरस्टोला धडकला. यावेळी त्याच्या पाठोपाठ सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानातून बाहेर केले. यानंतर जार्वोची जोरदार चर्चा सोशल मीडियावर झाली होती त्याच्याबाबत ट्रेंडही आला होता. त्यावेळीपासून जार्वो सर्वांच्या परिचयाचा झाला.
जार्वोचे खरे नाव डॅनियल जार्वीस असे आहे. मुळचा इंग्लंडचा असला तरी तो भारतीय संघाचा मोठा चाहता आहे. जार्वो प्रँकस्टार आणि यूट्यूबरही आहे.
जार्वो प्रसिद्धीसाठी अशी कृत्ये करत असतो. त्याला नेहमी प्रसिद्धी माध्यमांसमोर चमकत रहायला आवडत असल्याचे बोलले जात आहे.
परंतु जार्वोचा उर्मटपणा त्याच्या अंगलट आला आहे. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने त्याला आजीवन लीड्स मैदानावर प्रवेश बंदी केली आहे. तसेच दंडही आकारला आहे.