

वॉशिंग्टन : 'डुम्स डे' या नावाने प्रसिद्ध असलेले घड्याळ जगातील वाढत्या धोक्यांची तीव्रता दाखवत असते. सध्या जगभरातील युद्धे आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अणुशास्त्रज्ञांनी 'डुम्स डे क्लॉक' मध्यरात्री 12 च्या फक्त 90 सेकंद आधी सेट केले आहे. या बारा वाजले म्हणजे जगात विनाशाची वेळ आली आहे, असे मानले जाते! घड्याळाची वेळ बदलल्यानंतर शास्त्रज्ञांनी सांगितले की, रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 2 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. (Doomsday)
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला साडेतीन महिने उलटले आहेत. अशा परिस्थितीत अण्वस्त्रांच्या वापराचा धोका वाढत आहे. याशिवाय वातावरणातील बदल जगाला विनाशाकडे ढकलत आहेत. बुलेटिन ऑफ अॅटोमिक सायंटिस्टमध्ये सांगण्यात आले होते की, एआय आणि जैविक संशोधनासारख्या धोकादायक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. मात्र या धोक्यांना तोंड देण्याची तयारी पूर्ण झालेली नाही. बुलेटिनच्या अध्यक्षा रेचेल ब्राॅन्सन म्हणाल्या, चीन, रशिया आणि अमेरिका यासारखे तीन मोठे देश त्यांची अणुशक्ती वाढवण्यासाठी खूप पैसा खर्च करत आहेत. त्यामुळे अणुयुद्धाचा धोका वाढत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रशियाने अमेरिकेसोबतचा न्यू स्टार्ट करार रद्द केला होता. (Doomsday)
दोन्ही देशांतील अण्वस्त्रांची संख्या मर्यादित करणे हा या कराराचा उद्देश होता. जगातील 90 टक्के अण्वस्त्रे फक्त रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. याशिवाय, मार्च 2023 मध्ये रशियाने बेलारूसमध्ये आपली सामरिक अण्वस्त्रेही तैनात केली होती. अनेक रशियन मंत्री आणि अधिकारी युक्रेनवर आण्विक हल्ल्याच्या धमक्या देत आहेत. रेचेल यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2023 मध्ये रशियाने अण्वस्त्रांच्या चाचणीवर बंदी घालणारा कायदाही हटवला होता. दुसरीकडे, अनेक अहवालांमध्ये चीन आणि उत्तर कोरियानेही अण्वस्त्रे बनवल्याचा दावा केला आहे. त्याच वेळी, 2023 हे जगातील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. हरितगृह वायूंचे उत्सर्जनही सातत्याने वाढत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन 'डुम्स डे' घड्याळ विनाशापासून अवघ्या 90 सेकंदांच्या अंतरावर ठेवण्यात आले आहे.
'डुम्स डे' घड्याळ म्हणजे काय? ते कसे कार्य करते?
शास्त्रज्ञ दरवर्षी 'डुम्स डे' क्लॉकची वेळ बदलतात. शिकागोतील एका ना नफा संस्थेने 1947 मध्ये दुसर्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या तणावादरम्यान लोकांना सावध करण्यासाठी घड्याळ तयार केले. मानवजात जगाच्या शेवटाच्या किती जवळ आहे, हे दाखवण्याचा त्याचा उद्देश आहे. अल्बर्ट आईनस्टाईन आणि रॉबर्ट ओपेनहायमर यांनी 1945 मध्ये तयार केलेल्या अणुशास्त्रज्ञ बुलेटिनवर हे घड्याळ बसवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 'डुम्स डे' क्लॉकची वेळ आतापर्यंत 25 वेळा बदलण्यात आली आहे.