पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष नको

पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष नको
Published on
Updated on

पाणी ही आर्थिक वस्तू आहे, यावर जगाने शिक्कामोर्तब केले. पाणी हा उत्पादन खर्चाचा एक भाग आहे. चुकीच्या पद्धतीने पाणी वापरले, तर उत्पादन खर्च वाढतो. याउलट योग्य पद्धतीने त्याचा वापर करून त्याची उत्पादकता वाढविली जाऊ शकते. आपण गप्पा मारतो 'मोअर क्रॉप, पर ड्रॉप'च्या पण प्रत्यक्षात मात्र असे अब्जावधी ड्रॉप्स आपण कसे वाया घालवतो याची गणतीच होत नाही.

पाणी ही आर्थिक बाब आहे, ही गोष्ट आता जगन्मान्य झाली आहे. 1992 मध्ये डब्लिन येथील परिषदेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि पाणी ही आर्थिक वस्तू आहे, यावर जगाने शिक्कामोर्तब केले. कोणतीही गोष्ट आर्थिक वस्तू आहे काय हे तपासून बघण्यासाठी अर्थशास्त्रात दोन महत्त्वाचे निकष लावले जातात. पहिला निकष ती दुर्मीळ असावी हा आहे. पाणी कोणे एके काळी मुबलक आहे, असे समजले जात असे. ती निसर्गाची देण आहे, निसर्ग त्यासाठी कोणताही आकार लावत नाही, ते आपण वाटेल तसे वापरले तरी चालण्यासारखे आहे, अशी सर्वांची समजूत होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जगाची लोकसंख्याच कमी होती. प्रत्येक माणसाच्या वाट्याला अमाप पाणी उपलब्ध होते; पण आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. पाण्याचे साठे मर्यादित आहेत, याची जाण आता जगाला आलेली आहे. आज एक लिटर पाण्यासाठी आपण किमान 15 रुपये मोजायला लागलो आहोत, हे कशाचे द्योतक आहे? आपल्याला महानगरपालिकेचा एक टँकर हवा असल्यास आपल्याला दोन-तीन हजार मोजावे लागतात. कोणताही पदार्थ मागितल्याशिवाय हॉटेलमध्ये आज पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

खरे पाहिले असता निसर्गाच्या सगळ्याच देणग्या एके काळी विनामूल्य मिळत होत्या; पण आज जमीन, खनिज, लाकूड आपल्याला विकत घ्यावे लागत आहे. मोटारीत हवा भरताना वा ऑपरेशन करताना आपल्याला ऑक्सिजनसाठी पैसे मोजावे लागतात. इतके दिवस पाणी हो-नाहीच्या उंबरठ्यावर उभे होते; पण आता पाण्याने उंबरठा ओलांडला आहे आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतात, ही बाब अंगवळणी पडत चालली आहे. दुसरा निकष विनिमयतेशी निगडित आहे. पाणी हे विनिमेय आहे. ते दिले किंवा घेतले जाऊ शकते. नुकतीच जगात पाण्याची बाजारपेठही सुरू झालेली आहे. जागतिक शेअरबाजारात पाण्याचा वायदे बाजारही सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला पाण्याच्या उत्पादकतेचा विचार करायचा आहे. पाणी आणि पैसा यात आता फरक राहिला नाही. एक रुपया खर्च करून जसे आपण त्यापासून दोन रुपये, तीन रुपये निर्माण करण्याची मनीषा बाळगतो तसेच आता आपणाला पाण्याकडे पाहायचे आहे. पाणी हे उत्पादक आहे.

योग्य पद्धतीने त्याचा वापर करून त्याची उत्पादकता वाढविली जाऊ शकते. आपण गप्पा मारतो मोअर क्रॉप, पर ड्रॉपच्या पण प्रत्यक्षात मात्र असे अब्जावधी ड्रॉप्स् आपण कसे वाया घालवतो याची गणतीच होत नाही. घरात, शेतीत, कारखान्यात, वितरणात किती पाणी वाया जाते याचा आपण कधी अंदाज केला आहे का?

परदेशात एका एकरात 125 ते 150 टन ऊस पिकवला जातो. आपल्याकडे हे प्रमाण 30 ते 35 टनांच्या घरात आहे. ते जेवढे पाणी वापरतात त्याच्या चौपट पाणी आपण वापरतो. इतके असूनही आपले उत्पादन इतके कमी का याचा आपण विचार कधी करणार आहोत? तेवढेच उत्पादन मिळवण्यासाठी आपण पाचपट जमीन वाया घालवतो. असंख्य धरणे बांधून आपण करोडो रुपये खर्च केले. त्यासाठी जागतिक संस्थांकडून कर्ज काढले. या कर्जाची परतफेडही नियमितपणे चालू आहे. कोठून होते ही परतफेड? आपण कराच्या स्वरूपात जो पैसा भरतो त्यातून ही परतफेड होत असते. म्हणजे पाणी वापरतो एक आणि परतफेड करतो दुसराच. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण सर्वजण मिळून अकार्यक्षमता पोसण्यास मदत करतो, असे म्हणावयास हरकत नाही. जमा झालेले पाणी उत्पादक पद्धतीने वापरले गेले पाहिजे, वापरलेल्या पाण्यातून जास्तीत जास्त संपत्ती निर्माण झाली पाहिजे, तरच या खर्चाचे समर्थन करता येईल. यासंदर्भात एक उदाहरण देणे अपरिहार्य ठरते. इजिप्तने जेव्हा अस्वान धरण बांधले तेव्हा त्या धरणाला आलेला खर्च सरकारने दोन वर्षांत पाणी वापरणार्‍यांकडून वसूल केला. आपण मात्र या प्रश्नाकडे डोळे बंद करून बसलो आहोत, ही निश्चितच खेदाची बाब आहे.

– डॉ. दत्ता देशकर, जल अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news