

प्रसिद्ध चिकित्सक आणि बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले भारतरत्न डॉ. बी. सी. रॉय यांचा जन्मदिन आणि पुण्यस्मरण दिन असलेला 1 जुलै हा दिवस 1991 पासून देशात राष्ट्रीय 'डॉक्टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. सेवाभावी वृत्तीने काम करणार्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे हा यामागचा हेतू; पण असा कृतज्ञता भाव सध्या प्रत्येकाच्या मनात आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
अनेक शहरांत डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अत्यवस्थ रुग्ण दगावणे, रुग्णाला तातडीने न तपासणे, रुग्णाकडे दुर्लक्ष करणे, नातेवाईकांशी नीट न बोलणे अशा बाबी समोर करून डॉक्टर किंवा स्टाफ यांना मारहाण करणे, धाकधपटशा दाखवणे किंवा हॉस्पिटलची तोडफोड करण्याचे प्रकार अनेकदा घडतात. अशा घटनांमध्ये रुग्ण किंवा जवळचे नातेवाईक यांची काहीच तक्रार नसते; पण बाहेरचे कुणीतरी अन्य हेतूनी प्रेरित होऊन असे निंद्य प्रकार करतात. रुग्णाकडे दुर्लक्ष होणे, त्याला वेळीच उपचार न मिळणे, उपचारात दिरंगाई होणे, चुकीचे निदान किंवा उपचार होणे, असे प्रकार व्हायला नकोतच. किंबहुना असे काही झाले तर, त्याची योग्य ती चौकशी होऊन ते सिद्ध झाले, तर त्यासाठी शिक्षादेखील व्हायला हवी; पण या सर्व गोष्टींसाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतून हे घडायला हवे. आज-काल अशी प्रतीक्षा न करता कायदा हातात घेण्याचे प्रकार घडतात, ते थांबायला हवेत. कारण, त्यामुळे चांगल्या डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती हळूहळू कमी होत जाईल, जे समाजासाठी अधिक हानिकारक आहे.
एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीची रुग्णाची स्थिती, आजाराची तीव—ता आणि रुग्ण पूर्ण बरे होण्याच्या शक्यता याबाबत संपूर्ण माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी घ्यावी. उपचारांवर होणारा संभाव्य खर्चसुद्धा समजावून घ्यावा. अशी माहिती देण्याची यंत्रणा रुग्णालयात असतेच; पण रुग्ण दाखल करताना रुग्णासोबत असणारे नातेवाईक आणि काही विपरीत घडल्यानंतर रुग्णालयावर हल्ले करणार्या व्यक्ती या वेगळ्याच असतात. खरे तर, असा हल्ला करणार्यांसाठी सरकारने कायदा केलेला आहे; पण अनेकदा या व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे हल्लेखोरांचे फावते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. याही बाबतीत ते खरे आहे. डॉक्टर होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आयुष्यातील महत्त्वाची दहा ते बारा वर्षे अभ्यास आणि तहान-भूक-झोप बाजूला ठेवून घालावावी लागतात. दोन-तीन दशकांपूर्वी जवळपास सर्वांसाठी मोफत असणारे वैद्यकीय शिक्षणही आता महाग झाले आहे. पदवीनंतर वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल हे लागतेच. वैद्यकीय पेशा सचोटीने सांभाळताना कोणताही डॉक्टर खूप मेहनत आणि कसरतही करतो. एखादा रुग्ण रात्री-अपरात्री येतो, तेव्हा त्या क्षणी आवश्यक ती वैद्यकीय सेवा तत्परतेने पुरवितो. वैयक्तिक अडचणी, आवडीनिवडी, छंद, ताणतणाव, कौटुंबिक बाबी, सण-उत्सव-घरगुती समारंभ या सर्व गोष्टी बाजूला ठेवून तो अग्रक्रमाने रुग्णाकडे धाव घेतो. तो प्रत्येक रुग्णावर अत्यंत मनापासून उपचार करतो; पण डॉक्टर म्हणजे देव नव्हे. तोही माणूस असतो.
आपल्याकडे आलेला रुग्ण लवकर बरा व्हावा, अशी डॉक्टरांची इच्छा असते. त्यामुळे बहुतांश डॉक्टर खूप काम करतात. कामाच्या व्यापामुळे तणावग्रस्त होतात. इतर व्यावसायिकांच्या मानाने डॉक्टरांंचे आयुष्यमान कमी असते. ही वस्तुस्थिती असूनही एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर डॉक्टरांना होणारे मानसिक समाधान मोठे आणि महत्त्वाचे असते. आपल्या हातून बर्या झालेल्या रुग्णाच्या चेहर्यावरील हास्य पाहून डॉक्टरांना जे समाधान मिळते, त्याचे मूल्य सांगता येणार नाही.
आज वैद्यकीय सेवा ही सेवा न राहता तो व्यवसाय बनू पाहत आहे; पण वैद्यकीय सेवा ही इंडस्ट्री होऊ शकत नाही. कारण, रुग्ण हा कधी स्वेच्छेने रुग्ण बनत नाही. त्यामुळे त्याला ग्राहक म्हणणे गैर ठरते; पण काळ बदलला आणि सारेच बदलले. गेल्या दोन दशकांत तर सर्वच क्षेत्रांत उलथापालथ झाली. अबालवृद्ध आभासी जगात गुंग झाले. माणसे माणसांपासून दूर गेली. मने दुभंगण्याचे प्रकार वाढले.
– डॉ. अनिल मडके