

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून सध्या जपान दौर्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा केली. कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कोयासन विद्यापीठाला भेट दिली. तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली.
कोया-चो येथील मेयर योशिया हिरानो हे आपल्या आगामी मुंबई दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करतील.
वाकायामा गव्हर्नर यांच्यासमवेत भेट
मंगळवारच्या दौर्यात कोयासन विद्यापीठात जाण्यापूर्वी पहिली बैठक ही वाकायामा प्रिफिक्चरचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यांच्यासमवेत झाली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित केले होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानसोबत निर्माण केलेल्या संबंधातून महाराष्ट्र आणि वाकायामा या दोघांमधील संबंध आणखी वृद्धिंगत झाले आहेत. जपानमधील कंपनी आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रात यावेत, यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत राज्य सरकार करेल. जपानी भाषेचे ज्ञान असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असलेला एक विशेष कक्ष राज्यात स्थापन करण्यात येईल.