

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक नागरिकांवर लाठ्याकाठ्या चालवून, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून दमबाजी आणि हुकूमशाही पद्धतीने केलेला विकास काही कामाचा नाही. स्थानिकांना विचारात घेऊन पर्यावरणासोबत विकास होणे गरजेचे आहे, असे मत माजी पर्यावरणमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. महापालिकेने वेताळ टेकडीवरून प्रस्तावित केलेल्या रस्त्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे.
या पर्यावरणप्रेमींना पाठिंबा देण्यासाठी अदित्य ठाकरे यांनी शनिवारी वेताळ टेकडी येथे भेट दिली. या वेळी पर्यावरणप्रेमींसह शिवसेना नेते आमदार सचिन अहिर, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे उपस्थित होते. माध्यमांशी बोतलाना ठाकरे म्हणाले, राज्याला हवे असलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांत पाठवून जनतेला नको असलेले वेताळ टेकडी, नदी सुधार, आरे, बारसू असे प्रकल्प घटनाबाह्य सरकार हुकूमशाही पद्धतीने दमदाटी करून राबवत आहे.
एकीकडे मेट्रो प्रकल्प होत असताना दुसरीकडे नवीन प्रकल्प आणले जात आहेत. वाहतुकीचा अभ्यास करून स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प करणे गरजेचे आहे. मात्र, स्थानिकांचा विरोध असताना प्रकल्प लादणे चुकीचे आहे. नागरीकरण वाढत असले तरी त्यामध्ये 'अर्बन फॉरेस्ट' ही संकल्पना आहेच. त्यामुळे वेताळ टेकडी जपली पाहिजे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही वेताळ टेकडीवर बेताल विकास नको; अन्यथा आक्रोश होईल, अशी भूमिका घेत ठाकरे यांनी प्रकल्पास विरोध केला.
नदी सुधार प्रकल्पात पर्यावरण विभागाची परवानगी घेताना तेथे एकही झाड तोडले जाणार नाही, असे सांगून परवानगी घेतली आहे. पण आता साडेसहा हजारांपेक्षा जास्त झाडे तोडली जाणार आहेत. नदी सुशोभित करण्यापेक्षा ती आधी स्वच्छ करणे आवश्यक आहे. बाहेरचे सल्लागार येऊन नद्यांची वाट लावतात, त्यापेक्षा स्थानिकांना समजून घेणे आवश्यक आहे, असेही ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी भक्कम आहे, आम्ही सत्तेसाठी किंवा पदासाठी एकत्र आलेले नसून, संविधान वाचविण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमची वचनबद्धता 50 खोक्यांसारखी नाही, तर संविधान टिकविण्यासाठी आहे. उन्हाळा संपल्यानंतर आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा घेणार आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.