

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला. कर्णधार रोहित शर्माने या विजयासह विक्रम केला, मात्र माजी निवड समिती सदस्य सबा करीमने आता त्याच्या फॉर्मबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. कर्णधारपदाच्या दबावाखाली फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास विसरू नकोस, असा सल्ला सबा करीम यांनी दिला आहे.
एका पॉडकास्टमध्ये सबा करीम म्हणाले, 'रोहित हा त्याच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे टीम इंदियाच्या प्लेइंग-11 मध्ये आहे, त्याच्यासाठी कर्णधारपद ही अतिरिक्त जबाबदारी आहे. अशा स्थितीत रोहितने फलंदाजीकडे दुर्लक्ष करू नये. कर्णधारपदाच्या दबावाखाली खेळाडू आपले प्राथमिक कौशल्य विसरतात, असे अनेकवेळा दिसून आले आहे.'
'रोहित शर्मासाठी हा फक्त प्रारंभिक टप्पा आहे, संघासाठी त्याच्या धावा किती महत्त्वाच्या आहेत हे त्याला कळेल. विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माची कामगिरी खूप महत्त्वाची असेल, जिथे मैदान मोठे असेल आणि प्रतिस्पर्धी संघाकडे सर्वोत्तम गोलंदाज असतील. अशा परिस्थितीत रोहित शर्माने त्या दिशेने काम करण्याची गरज आहे', असल्याचेही करीम यांचे म्हणणे आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित (Rohit Sharma) शर्मा काही खास कामगिरी करू शकला नाही. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात 44 धावा केल्या होत्या आणि उरलेल्या दोन सामन्यात त्याला फक्त 1, 5 धावा करता आल्या. मात्र, या मालिकेत रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली सलग तीन टी-20 मालिका प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला.