Dnyaneshwari : ज्ञानेश्वरीतील दिवाळी

Dnyaneshwari
Dnyaneshwari
Published on
Updated on

 Dnyaneshwari : संत ज्ञानेश्वरांची प्रतिभासृष्टी ही सोनचाफ्यासारखी तेजस्वी आहे. त्यांनी योजलेल्या प्रतिमा आणि उपमा या अर्थपूर्ण आहेत. दीपावली आणि दीप या कल्पनांचे ज्ञानदेवांनी केलेले मनोहर आणि अर्थपूर्ण विश्लेषण लक्षात घेतले असता, आधुनिक दिवाळीचे रंग अधिक चांगल्या प्रकारे उलगडू शकतात.

ज्ञानेश्वरीमध्ये महाराष्ट्रातील समाजजीवन तसेच शेती, सण-समारंभ आणि सांस्कृतिक जीवनाचे अनेकविध पैलू प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे प्रकटले आहेत. मराठी संतांनी दीपावलीचा आध्यात्मिक अर्थ सांगितला आहे. जगत्गुरू संत तुकाराम महाराजांनी तर 'साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा,' असे म्हटले आहे. संतश्रेष्ठ नामदेव तर 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी,' असा आत्मविश्वास प्रकट करतात. नामदेवांनी खुद्द पांडुरंगाला दिवाळीच्या निमित्ताने आपल्या घरी बोलावले आहे. संत जनाबाई त्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढते आहे. ज्ञानदेवांची प्रतिभासृष्टी ही सोनचाफ्यासारखी तेजस्वी आहे. त्यांनी योजलेल्या प्रतिमा आणि उपमा या अर्थपूर्ण आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वरी हे विवेकतरूचे उद्यान आहे. भुकेल्या चकोराला ज्ञानरूपी चांदण्यातून अमृत देण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीत आहे. दीपावली आणि दीप या कल्पनांचे ज्ञानदेवांनी केलेले मनोहर आणि अर्थपूर्ण विश्लेषण लक्षात घेतले असता, आधुनिक दिवाळीचे रंग अधिक चांगल्या प्रकारे उलगडू शकतात.

योगियांची दिवाळी : ज्ञानदेवांना अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान आणि विवेकाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवावयाचा होता. ज्ञानी किंवा योगी माणसाच्या जीवनात दिवाळीचे दीप अखंड तेवत राहतात; कारण त्याची साधना ही अपूर्व आणि अद्भुत असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणतात,

मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळी ॥
तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥ – अध्याय 4.54

 Dnyaneshwari : ज्ञानदेवांनी योगिराजाच्या दिवाळीचे केलेले हे विश्लेषण अर्थपूर्ण आहे. त्यांना असे म्हणावयाचे आहे की, विवेकरूपी दिव्याला आलेली अविचाराची काजळी झाडून तो दिवा मी प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना अखंड दिवाळीच भासते. याचा अर्थ असा की, योगी किंवा तपस्वी व्यक्तीच्या जीवनातील दिवाळीचा प्रकाश हा अखंडपणे तेवत राहणारा असतो; कारण त्याने अविवेकाची काजळी आपल्या साधनेने केव्हाच दूर केलेली असते. मानवी जीवनामध्ये सर्वप्रकारची दु:खे अविवेकामुळे निर्माण होतात. मनावर चढलेली ही अविवेकाची जळमटे दूर केली असता ज्ञानाचा प्रकाश अखंडपणे प्रकाश देत राहील, असे त्यांना वाटते.

दीप आणि प्रकाश यांचे अखंड नाते असते. दीप प्रज्वलित होतो आणि त्यातून निर्माण झालेला प्रकाश हा अंधार नाहीसा करून ज्ञान आणि विवेकभावाचा प्रसार करतो. 'तमसो मा ज्योतिर्गमय' या सुभाषिताप्रमाणे ज्ञानाला अमरत्व प्राप्त करून देण्याचे कार्य दीपाच्या माध्यमातून घडते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी दीप आणि प्रकाशातील नाते स्पष्ट करताना प्रकटपणे मांडलेला सूत्ररूप विचार महत्त्वाचा आहे. ते म्हणतात,

दीपा आणि प्रकाशा । एकवींकीचा पाडु जैसा ।
तो माझां ठायी तैसा । मी तयामाजीं ॥ – अध्याय 7.96

ज्ञानदेवांनी दीप आणि प्रकाशाचे अभिन्नत्व मोठ्या योजकतेने आणि कुशलतेने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी आपण लाखो दिव्यांची सजावट करतो, त्यामागचा प्रतीकात्मक अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. दिवा आणि प्रकाश हे दोन्ही जसे एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिशादर्शन करताना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. गुरू व शिष्यातील हा एकत्वाचा विचार दीप व प्रकाशाप्रमाणेच परस्परपूरक आहे.

 Dnyaneshwari : दीपु ठेविला परिवरी : एखाद्या घरात आपण दीप प्रज्वलित करतो म्हणजे तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्माची आठवण करून देतो आणि कर्तव्यभावना जागृत ठेवतो. परिवारातील प्रत्येक घटकाला आपल्या नियोजित कार्याविषयी तो जाणीव करून देतो. भगवान श्रीकृष्णाच्या कर्मयोगाची दिशा या दीपरूपी प्रतीकाचा उपयोग करून ज्ञानदेवांनी स्पष्ट केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी केली जाणारी दिव्यांची आरास ही परिवारातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कर्तव्याचा बोध करून देते, असे यावरून स्पष्ट होते. ज्ञानदेव म्हणतात :

दीपु ठेविला परिवरी । कवणाते नियमी ना निवारी ।
आणि कवण कवणिणये व्यापारी । राहाटे तेहि नेणे ॥ – अध्याय 9.28

ज्ञानदेवांनी प्रस्तुत ओवीमध्ये दीपाचे अज्ञान दूर करण्याचे आणि ज्ञानरूपी प्रकाश पोहोचविण्याचे कार्य कर्मयोगाशी जोडले आहे. भगवान श्रीकृष्णाचा कर्मयोगाचा संदेश या माध्यमातून त्यांनी यथार्थपणे साकारला आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या घरात दिवा लावून ठेवला तर कोणाला काम करण्याचे नियम तो घालून देत नाही किंवा कोणाला प्रतिबंध करीत नाही. शिवाय, कोण कोणत्या प्रकारे काम करतो तेही जाणून घेत नाही. ज्याप्रमाणे तो दिवा 'तटस्थ' असतो; परंतु घरातील सर्वांच्या व्यवहार करण्याच्या प्रवृत्तीचे कारण असतो. दिव्याच्या प्रकाशपर्वात प्रत्येकजण अप्रत्यक्षपणे आपली कामे यथार्थपणे करीत असतो. आपल्या कर्तव्यकर्मातील तटस्थता आणि सक्रियता यांचा सुरेख संगम ज्ञानदेवांनी साधला आहे.

एकचि तेज सरिसे :
कोट्यवधी दिव्यांमध्ये एकच तेज सारखेच भरलेले आणि भारावलेले असते. हे तेज नवचैतन्य प्रदान करते. त्यातून जी ऊर्जा तयार होते ती वादळातून बाहेर पडण्यासाठी प्रेरक ठरते. सर्वप्रकारच्या संकटांवर मात करण्याची चैतन्यदायी शक्ती या कोट्यवधी दिव्यांच्या प्रकाशातून प्राप्त होते. ज्ञानदेव म्हणतात,

दीपांच्या कोडी जैसे । एकचि तेज सरिसे ।
तैसा जो असे । सर्वत्र ईशु ॥ – अध्याय 13.1076

कोट्यवधी दिव्यांत एकच तेज समभावाने भरलेले असते, तसा ईश्वर सर्वत्र चराचरात भरलेला आहे. समत्वाने चराचराकडे पाहत जो जगतो, तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात सापडत नाही. अशाप्रकारचे समत्व आणि संतुलित जीवन जगण्याची प्रेरणा या कोट्यवधी दिव्यांच्या प्रकाशातून भारतीयांना गेल्या तीन हजार वर्षांपासून प्राप्त होत आहे. अयोध्येपासून कन्याकुमारीपर्यंत देशभर कोट्यवधी दिव्यांची प्रकाश-शक्ती प्रकट केली जाते व त्यातून अर्जुनासारख्या भांबावलेल्या समाजाला कर्मयोगाचा संदेश देण्याचे कार्य या दीपावलीच्या माध्यमातून घडते.
दीपाते दीपे प्रकाशिजे : एक दिवा असंख्य प्रकाशज्योतीचा प्रसार करतो. दिव्याने दिवा लावला की, अगणित प्रकाशकिरणे नभांगणात प्रवेश करतात आणि अंधार नाहीसा करून नवे ज्ञानपर्व आणतात. दिवा हे सांस्कृतिक जीवनाच्या अभ्युदयाचे प्रतीक आहे. ज्ञानदेवांनी म्हटले आहे :

दीपाते दीपे प्रकाशिजे । ते न प्रकाशणेचि निपजे ।
तैसे कर्म मियां कीजे । ते करणे कैचे? – अध्याय 18.1176

 Dnyaneshwari : ज्ञानदेवांनी अनेक समर्पक प्रतिमांचा उपयोग करून सुंदर उपमा देऊन प्रकाशपर्वाचे गीत गायिले आहे. त्यांनी सूत्रबद्ध विश्लेषण करून असे प्रतिपादन केले आहे की, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहणे म्हणजे पाहणे होत नाही किंवा सोन्याने सोन्याला झाकणे म्हणजे सोने उघडेच ठेवणे असते. दिव्याने दिव्याला प्रकाशिले असता ते न प्रकाशनेच होते. त्याप्रमाणे तद्रूप होऊन कर्म करणे त्याला कर्म कसे म्हणता येईल?

ज्ञानदेवांनी मांडलेला हा विचार एक नवा संदेश देऊन जातो. भगवान श्रीकृष्णाचे विचार ज्ञानदेव अर्जुनाला सांगत आहेत, म्हणजेच तो संदेश त्यांनी लाखो वारकरी भक्तजनांपर्यंत पोहोचविला आहे. दिव्याने दिव्याला प्रकाशमान करावे त्याप्रमाणे गीतेमधील हा कर्मयोगाचा संदेश सर्व ज्ञानी जनांनी सर्वदूर पोहोचवावा, असे ज्ञानदेवांनी आवाहन केले आहे.

दीपे दीप लाविला : ज्ञानदेवांनी आपला विचार भावार्थदीपिकेच्या माध्यमातून 'इये मराठीचीये नगरी' सर्वदूर पोहोचविला. 'ये हृदयीचे ते हृदयी घातले । हृदयी हृदय एक जाले' असा हा आध्यात्मिक संवाद आहे. एक दिवा दुसर्‍या दिव्याला जेव्हा मिळतो आणि त्यातून ज्ञानाची कोट्यवधी किरणे सर्वदूर पोहोचतात त्याप्रमाणे ज्ञानदेव आपल्या अभिजात अभिव्यक्तीतून पुन:प्रत्ययाचा आनंद देतात.

ज्ञानदेवांनी दीप ही प्रतिमा योजकतेने विकसित केली आहे आणि त्यातून कर्मयोग उलगडला आहे. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता द्वैत कायम राहते. हे द्वैतपण प्रकाशाच्या द़ृष्टीने त्यांचे ऐक्य भंग होत नाही. त्याप्रमाणे देवभक्तपणा न भंगता देवांनी अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतले आहे. ज्ञानदेवांनी ही कल्पना स्पष्ट करताना केलेले विश्लेषण अद्भुत आहे. त्यांच्या मते, आलिंगनाच्या वेळी देवांनी आपल्या हृदयातील बोध अर्जुनाच्या हृदयात घातला. देव व भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. यावरून असे स्पष्ट होते की, आपण दिवाळीच्या वेळी जे एकसारखे अनेक दिवे प्रज्वलित करतो त्यातून प्रगट होणारा विचार हा आपल्याला कर्मयोगाचा संदेश देत असतो.

दीपा आगिलु मागिलु : प्राजक्ताची फुले ताजी आणि शिळी असा फरक करता येत नाही. त्यांचा सुगंध तेवढाच चिरतरुण असतो. ज्ञानदेवांना दीपावलीतील दिव्यांचे महत्त्व उमजले आहे. दिवा लहान-थोर असा फरक करता येत नाही. दिवा म्हणजे जणू छोटा सूर्यच. सूर्याचा जो प्रकाश देण्याचा धर्म आहे तोच दिवाही कर्तव्यबुद्धीने बजावत असतो. ज्ञानदेवांनी त्यामुळे अशा दीपांची तुलना करताना जुन्या-नव्या पारिजाताच्या फुलांत आपण फरक करू शकत नाही, असे म्हटले आहे.

दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु ।
अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा ॥ – अध्याय 18.1678

ज्ञानदेवांनी आपल्या रचनांतून त्रिकालाबाधित सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, दिवा आधी कोणता? मागचा कोणता? सूर्य लहान की थोर? अमृतसागर सखोल की उथळ? याबद्दल व्यर्थ चर्चा काय कामाची? कामधेनू तान्ही आहे की दुभती? या गोष्टीचा विचार करता येत नाही. प्राजक्ताच्या फुलांतील ताजा-शिळा असा फरक व्यर्थ आहे. ती सुगंधीच असतात. गीतेतील श्लोकांमध्ये पहिले-शेवटचे; उत्तम-मध्यम असा क्रम लावता येत नाही. हे सर्व श्लोक परस्परपूरक व अर्थपूर्ण आहेत आणि मानवाला अखंडपणे ज्ञानप्रकाश व संस्कार देणारे आहेत.

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो : ज्ञानदेवांनी दिवा आणि सूर्य यातील ज्ञानप्रकाशाचे समान कार्य अधोरेखित केले आहे. सौरशक्ती ही सर्व प्रश्न सोडविते, असे आज आपण मानतो. त्यामुळे शतकानुशतके लोक सूर्यनमस्कार घालत आहेत. गरीब लोकांच्या जीवनातील अंधार नाहीसा व्हावा आणि त्यांचे जीवन फुला-फळांनी बहरावे, अशी ज्ञानदेवांची इच्छा आहे. 'पसायदाना'त ते म्हणतात,

दुरितांचे तिमीर जावो । विश्व स्वधर्मे सूर्ये पहो ॥
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥3॥ – पसायदान 18.3

यावरून असे स्पष्ट होते की, सामान्य माणसाच्या जीवनातील अंधार नाहीसा होवो. संपूर्ण विश्वाला त्याच्या स्वधर्माचा सूर्य पाहण्याची प्रेरणा मिळो. त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही इप्सित साध्य होवो, अशी ज्ञानदेवांची प्रार्थना आहे. म्हणजे ज्ञानेश्वर एका अर्थाने सार्‍या जगात सांस्कृतिक समानतेचा विचार मांडत आहेत. गीतेच्या अर्थाचा प्रकाश सर्वांच्या अंगणात पाहावा ही ज्ञानदेवांची अंतरीची तळमळ आहे. अशाप्रकारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची दिवाळी ही आध्यात्मिक आनंद द्विगुणीत करणारी आहे.

'इये मराठीचीये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळू ।'

सुकाळू व्हावा म्हणून ज्ञानदेवांनी महाराष्ट्रभूमीतील लोकांना दिवाळीचा नवा प्रकाश दिला. त्यांच्या आध्यात्मिक चिंतनातील कर्मयोगाचा विचार निरंतर नवीन जाणीव करून देणारा आहे. 'ईश्वरनिष्ठांची मांदियाळी' उभी करताना त्यांनी पेटविलेले ज्ञानाचे दीप आजही मंगलमय प्रकाश देत आहेत. साधुसंतांच्या सान्निध्यात महाराष्ट्र संस्कृतीचे नवे चैतन्यरूप प्रकट होत आहे. दिवाळीच्या मंगलपर्वात ज्ञान, विवेक, सौंदर्याचा प्रकाश सर्वांच्या अंगणात पडावा आणि महाराष्ट्रातील घराघरांत प्रत्येकाच्या मनाच्या देव्हार्‍यात तेवत असलेला हा नंदादीप सदैव नवा प्रकाश देत राहो, असे ज्ञानदेवांना वाटते.

डॉ. वि. ल. धारूरकर

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news