

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - भावी पिढीने देखील पूर्वजांपासून जतन करण्यात आलेली आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती जतन करावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील मैदानावरील आदीवासी समाजाचे तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व आदिवासी जमा होऊन दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस उत्साहात साजरा केला. याप्रसंगी वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी समजातील वारली, कोकणा महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी, क- ठाकर व म-ठाकर अशा आदीवासी जमातीच्या विविध जमाती एकत्र येऊन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक वेशभूषेत तारपा नृत्याच्या तालावर आदिवास महिला व पुरूषांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात वसुबारस सोमवारी (दि.28) रोजी सकाळी साजरी केली. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हा सण आदिवासीबांधव या ठिकाणी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात.
यावेळी आदिवासी वरळी समाज सेवा मंडळाच्या वतीने वसुबारस निमित्त आदिवासींनी तारपाधारी पुतळ्यास अभिवादन करून कुलदैवतांची पूजा केली. त्यानंतर ताल धरत तारपाधारी नृत्य सादर केले. मैदान आवारातील आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा (भांगरे) यांना देखील समाजबांधवांकडून अभिवादन करण्यात आले.
पूर्वजांपासून जतन करण्यात आलेली आदिवासी संस्कृती पुढील पिढीमध्ये देखील रुजवावी यासाठी दरवर्षी दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणाच्या मुहुर्तावर आदिवासी बांधव एकत्र येत नृत्य सादर करतात. यानिमित्ताने स्पर्धात्मक युगात संगणकीकरणामुळे वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासी बांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवत आहेत. यासाठी आदिवासी भाषा, संस्कृतीचा ठेवा जतन केला जात आहे.