

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीचा सण आता आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. पिंपरीतील मुख्य बाजारपेठेसह शहरातील प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. 'विकेंड'चे औचित्य साधून नागरिकांनी खरेदी करण्याची संधी साधली. बाजारपेठांत गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी देखील झाली होती.
शहरातील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेसह रिअल इस्टेट, सराफ बाजारात दसर्यापासून उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीसाठीही या क्षेत्रांनी अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मोबाईलसह एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी वस्तूंची मोठी रेंज इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत उपलब्ध आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातही बुकींगला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दिवाळीलाही ई-बाईक्सचा ट्रेंड राहण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातही तेजीचे वातावरण आहे. अनेक नवे गृहप्रकल्प शहर आणि परिसरात साकारत आहे. विविध बॅकांनी त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध केले आहे. विविध शोरूम्सनी दिवाळी खरेदीसाठी ऑफर्सचा खजीना खुला केला आहे.
तयार फराळाबरोबरच यंदा गिफ्ट आर्टिकल्सचाही मोठा ट्रेंड आहे. तयार फराळासह फराळासाठी लागणार्या किराणा साहित्याचीही खरेदी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या आठवडाभरात कपडे व फटाक्यांसह पणत्या, रांगोळी, आकाशकंदील आदींची खरेदी पूर्ण करण्यावर नागरिकांचा भर राहणार आहे.
ऑनलाइन खरेदीचे प्रस्थ वाढत असताना शनिवार आणि रविवार बाजारपेठेत झालेली गर्दी पाहता ऑफलाइन खरेदीलाही नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे. यंदा दसरा जोमाने झाल्यानंतर बाजारातील उलाढालीस वेग आला. हाच वेग व उत्साह कायम असल्याने दिवाळी सणाची लगबग बाजारात सुरू आहे. 'धनत्रयोदशी' येत्या शनिवारी, 22 ऑक्टोबरला आहे. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.