भविष्यातील ‘डिसीज एक्स’ म्हणजे नेमके काय?

भविष्यातील ‘डिसीज एक्स’ म्हणजे नेमके काय?
Published on
Updated on

नवी दिल्ली : या जगाला सातत्याने विविध रोगांचा सामना करावा लागलेला आहे. सन 1720 ला प्लेग, 1820 ला कॉलरा, 1920 ला स्पॅनिश फ्लू आणि 2020 ला कोरोना… गेल्या प्रत्येक शतकात एका मोठ्या साथीच्या आजारामुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. कोरोनातून आपण सावरतो न सावरतो, तोवर आणखी एका साथीच्या रोगाची चर्चा सुरू झाली आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक अर्थ परिषदेत डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस यांनी भविष्यातल्या महामारीसारख्या परिस्थितीशी लढण्यासाठी लागणार्‍या तयारीबाबत चर्चा केली. 'डिसीज एक्स' नावाच्या संभाव्य रोगामुळे ही महामारी येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान पाहता, भविष्यात हे घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सांगण्यात आले.

'डिसीज एक्स' म्हणजे काय?

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 'डिसीज एक्स' हा काही खराखुरा रोग नाही. जागतिक आरोग्य संघटनेने भविष्यातल्या एका गंभीर आजाराला दिलेले हे काल्पनिक नाव आहे. हा आजार कोणत्या इन्फेक्शनमुळे होईल, हे सांगता येत नसले तरी त्याचा प्रसार मात्र जगभर होऊ शकतो, असेही डब्ल्यूएचओने सांगितले आहे. खरे तर 'कोविड-19'च्या आधीच 'डिसीज एक्स' ही संज्ञा वापरली जात होती. फेब्रुवारी 2018 ला डब्ल्यूएचओने संभाव्य आजारांच्या यादीत 'डिसीज एक्स'चा उल्लेख केला होता.

भविष्यात कोरोनासारखा एखादा रोग आला तर त्याच्या चाचण्या, लसीकरण आणि औषधे लवकर तयार व्हावीत आणि कमीत कमी जीवितहानी व्हावी म्हणून ही तयारी केली जात आहे. यासाठी 'डब्ल्यूएचओ'ने जगभरातील तज्ज्ञांची एक टीम बनवली आहे. सार्स, स्वाइन फ्लू, मेर्स, इबोला आणि कोविड-19 सारख्या आजारांमुळे किती नुकसान होऊ शकते, याचा अंदाज आता आपल्याला आला आहे. आरोग्यतज्ज्ञांना भविष्यात याहीपेक्षा अधिक भयंकर आणि धोकादायक रोगाची साथ पसरू शकते, अशी भीती आहे आणि म्हणूनच या संभाव्य 'डिसीज एक्स'साठी तयारी केली जात आहे.

जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येसुद्धा या रोगाची चर्चा करण्यात आली. 'डिसीज एक्सची पूर्वतयारी' या विषयावर एक चर्चासत्र तिथे आयोजित करण्यात आले होते. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस यांनी या चर्चासत्रात सांगितले की, 'जर भविष्यात यापेक्षा मोठी महामारी आली तर अशा आव्हानांसाठी नवीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. काही लोकांना यामुळे दहशत निर्माण होऊ शकते असेही वाटू शकते. त्यामुळे एखाद्या रोगाचा अंदाज लावून आधीच त्याद़ृष्टीने तयारी केली तर ते योग्य ठरेल, कारण इतिहासात अनेकदा असे घडले आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news