

निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या ठाकरे वाईल्डलाईफ संस्थेने पश्चिम घाटातील गोड्या पाण्यात आढळणाऱ्या खेकड्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. यातील (new species of crabs) एक प्रजाती गोव्यातील मोले भागात आणि कर्नाटकच्या ठराविक भागात आढळून आली आहे.
नुकताच या शोधाबाबतचा अहवाल फ्रान्समधील झुसिस्टीमा या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. फ्रांसमधील नैसर्गिक इतिहासाच्या राष्ट्रीय संग्रहालयाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. (new species of crabs) ठाकरे वन्यजीव संस्था आणि डॉ समीर कुमार पती यांनी संयुक्तरीत्या हे संशोधन केले आहे. संशोधन कार्य २०१८ पासून सुरू होते.
पाच प्रजातींमध्ये सह्याद्रीयाना केशरी, सह्याद्रीयाना ताम्हिणी, सह्याद्रीयाना इनोपिंटाना , घाटीयाना रॉक्सि आणि घाटीयाना दुर्रेली यांचा समावेश आहे. यातील केशरी प्रजाती त्र्यंबकेश्वर भागात, दुर्रेली आंबा आणि कोयना भागात तर रॉक्सि ही प्रजात गोव्यातील मोले तसेच कर्नाटक मधील जोग फॉल्स परिसरात आढळते.
संशोधनात तेजस ठाकरे, स्वप्नील पवार, अक्षय खांडेकर, वैभव पाटील, विजय शेंडगे, संजय पाटील आणि विनोद अडके यांनी सहभाग घेतला होता. ठाकरे वन्यजीव संस्थेतर्फे गेल्या पाच वर्षात विविध जीवांच्या २१ नवीन प्रजाती शोधून काढण्यात आल्या आहेत.
पाच पैकी आंबा आणि कोयना भागात आढळलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ब्रिटिश पर्यावरण संरक्षक जेराल्ड माल्कम दुर्रेल यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश भारतात जन्माला आलेल्या जेराल्ड यांनी विविध प्रजातींचे संरक्षण केले होते. वन्यजीव संरक्षणात आसाममध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
गेल्या काही वर्षात पश्चिम घाटातील अनेक माहिती नसणाऱ्या प्रजातींचा शोध लागला आहे. यातील बहुतेक प्रजाती प्रदेशनिष्ठ म्हणजे याच ठिकाणी आढळतात. अजूनही पश्चिम घाट आपल्याला पूर्णपणे समजलेला नाही. येथील जैव विविधता जपणे जंगलतोड व चोरटी शिकार पूर्णपणे थांबणे आवश्यक आहे.
स्वप्नील पवार, संशोधक, कोल्हापूर