DC v KKR : त्रिपाठीचा षटकार आणि विजयी केकेआर, सहाव्या स्थानावरुन गाठली फायनल | पुढारी

DC v KKR : त्रिपाठीचा षटकार आणि विजयी केकेआर, सहाव्या स्थानावरुन गाठली फायनल

शरजा : पुढारी ऑनलाईन

कधीकाळी कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होती. ( DC v KKR ) मात्र आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात तळातून झुंजार खेळ करत केकेआरने फायनल गाठली. आजच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही १३६ धावांचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केलेल्या केकेआरचा संघ नंतर ढेपाळला. त्यांचे ४ फलंदाज शुन्यावर बाद झाले. मात्र राहुल त्रिपाठीने सामना हरणार असे वाटत असतानाच षटकार मारत केकेआरचे फायनलचे तिकीट बुक केले. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने दमदार ५५ धावांची खेळी केली. त्याला शुभमन गिलने ४६ धावा करुन चांगली साथ दिली.

दिल्लीकडून अश्विन, नॉर्खिया आणि राबाडा यांनी अखेरच्या ३ षटकात भेदक मारा करत केकेआरचे टेन्शन वाढवले. या तिघांनीही प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने ( DC v KKR ) दमदार सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी केकेआरला ६ षटकात ५१ धावांपर्यंत पोहचवले. यामध्ये व्यंकटेश अय्यरचा मोठा वाटा होता. त्याने आक्रमक फलंदाजी केली.

पॉवर प्लेनंतरही या दोघांनी धावांची गती चांगली ठेवत केकेआरला १० षटकात ७६ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, व्यंकटेश अय्यर आपल्या आपल्या अर्धशतकाजवळ पोहोचला होता. त्याने आपले अर्धशतक ३९ चेंडूत पूर्ण केले. मात्र त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो रबाडाच्या गोलंदाजीवर ५५ धावांवर बाद झाला.

अय्यर बाद झाल्यानंतर आलेल्या नितीश राणा आणि शुभमन गिलने १४ व्या षटकात केकेआरचे शतक धावफलकावर लावले. या दोघांनी २२ चेंडूत २७ धावांची भागीदारी रचली. मात्र केकेआरला विजयासाठी १३ धावांची गरज असताना नितीश राणा १३ धावा करुन बाद झाला. त्या पाठोपाठ शुभमन गिलही ४६ चेंडूत ४६ धावांची खेळी करुन बाद झाला.

रबाडा – नॉर्खिया – अश्विनने नाईटची केली हावा टाईट ( DC v KKR )

गिल बाद झाला त्यावेळी केकेआरला विजयासाठी २० चेंडूत ११ धावांची गरज होती. मात्र रबाडाने १८ व्या षटकात १ धावा देऊन दिनेश कार्तिकला बाद करत सामना १२ चेंडूत १० धावा असा आणला. १९ वे षटक टाकणाऱ्या नॉर्खियाने ३ धावा देत कर्णधार मॉर्गनला बाद केले. त्यामुळे आता सामना ६ चेंडूत ७ धावा असा आला.

शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या आर. अश्विनने पहिल्या चेंडूवर १ धाव दिली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धाव दिली नाही. त्याच्या पुढच्याच चेंडूवर शाकिब अल हसनला अश्विनने पायचित केले. यामुळे सामना ३ चेंडूत ६ धावा असा अवघड झाला. त्यानंतर आलेल्या नारायणने अश्विनला षटकार मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो झेलबाद झाला. आता केकेआरला २ चेंडूत ६ धावांची गरज होती. स्ट्राईकवर होता राहुल त्रिपाठी. त्याने अश्विनच्या डोक्यावर थेट षटकार मारत सामनाच संपवला. या षटकारामुळे केकेआर फायनलमध्ये पोहचली.

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ( DC v KKR ) यांच्यातील सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीत त्याला अडकवत १८ धावांवर बाद केले.

शॉ बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी आठव्या षटकात दिल्लीचे अर्धशतक धावफलकावर लावले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. मात्र केकेआरच्या कसलेल्या गोलंदाजीसमोर त्यांना धावगती वाढवण्यात अपयश आले. त्यामुळे दिल्लीने १० षटकात ६५ धावांपर्यंतच मजल मारली होती.

केकेआरच्या कसलेल्या गोलंदाजीसमोर दिल्ली मंदावली ( DC v KKR )

दहा षटकानंतर दिल्लीच्या स्टॉयनिसने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र, शिवम मावीने त्याचा १८ धावांवर त्रिफळा उडवत हाणून पाडला. पाठोपाठ शाकिब – अल – हसनने ३९ चेंडूत ३६ धावांची करणाऱ्या शिखर धवनला बाद करत तिसरा आणि मोठा धक्का दिला. त्यानंतर धावांची गती वाढवण्याचा दबाव असताना संघाचा कर्णधार ऋषभ पंत खेळपट्टीवर आला. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो ६ धावांवर लोकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

डावाचे १६ वे षटक आले तरी शतक पार न झालेल्या दिल्लीला सावरायला शिमरॉन हेटमायर मैदानात आला होता. मात्र वरुण चक्रवर्तीने त्यालाही फार हालचाल करण्याची संधी न देता ३ धावांवर बाद केले होते. मात्र चेंडू नो बॉल असल्याने हेटमायरला जीवनदानासकट एक फ्री हिटही मिळाली. अखेर १८ व्या षटकात दिल्लीने आपले शतक पार केले.

या जीवनदानाचा फायदा उचलत हेटमायरने काही आक्रमक फटके मारले. मात्र १९ व्या षटकात तो १० चेंडूत १७ धावा करुन धावबाद झाला. निम्मा संघ माघारी गेल्यानंतर आणि हातात अखेरचे षटकत राहिल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने दिल्लीला १३५ धावांपर्यंत पोहचवले. श्रेयस अय्यरने शेवटच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार मारत नाबाद ३० धावा केल्या.

दिल्लीने स्टायनिसला आणले परत ( DC v KKR )

केकेआरने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.  केकेआरने एलिमनेटर सामन्यात आरसीबीचा ४ विकेट्सनी पराभव केला होता. तर दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात एक बदल करत टॉम करनच्या जागी स्टॉयनिसला संधी दिली आहे.

या सामन्यातील विजेता संघ १५ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फायनल खेळेल. ( DC v KKR ) जर कोलकाता फायनलमध्ये गेली तर ते आपल्या तिसऱ्या विजेतेपदासाठी लढतील तर दिल्ली कॅपिटल्स आपल्या पहिल्या वहिल्या विजेतेपदासाठी सीएसकेशी भिडतील.

 

विराटचा उत्तराधिकारी होण्यासाठी ही नावे आहेत चर्चेत

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button