‘मानवी प्रतिष्ठेची बूज राखल्यास जगातील विषमता संपुष्टात येईल’

बोलताना संदीप कुमार व्ही. सोबत अभिनेता प्रसन्न शेट्टी आणि मेघना के. टी. (छाया : प्रभाकर धुरी)
बोलताना संदीप कुमार व्ही. सोबत अभिनेता प्रसन्न शेट्टी आणि मेघना के. टी. (छाया : प्रभाकर धुरी)
Published on
Updated on

पणजी

आपल्याला मुळात मानवी प्रतिष्ठा काय असते हे समजले आणि तिची बूज राखली गेली तर जगातील विषमता नाहीशी होईल, अशी आशा आरारीरारो चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप कुमार यांनी व्यक्त केली.

कन्नड चित्रपट 'आरारीरारो', आशावादाचा पुरस्कार करतो आणि प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या हेलावून टाकण्याची क्षमता राखतो. संदीप कुमार व्ही यांनी आज गोव्यातील ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. "जर आपल्याला मुळात मानवी प्रतिष्ठा काय असते हे समजले आणि तिची बूज राखली तर जगातील विषमता नाहीशी होईल. हा चित्रपट दोन अतिशय नगण्य व्यक्तींबद्दल आहे जे समाजाच्या खिजगणतीतही नाहीत, मात्र दुःखाच्या वेळी ते भावनिकदृष्ट्या एकमेकांमध्ये गुंतलेले दिसतात."

साधारण १६ दिवसांमध्ये चित्रित केलेला हा चित्रपट नशिबाने एकत्र आणलेल्या दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींबद्दल आहे. एक अटळ भावनिक गुंता या सुंदर विणलेल्या कथेचे सार आहे. एक अभिनेता म्हणून आपली बांधिलकी आणि चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल केलेल्या तयारीबद्दल बोलताना, मुख्य अभिनेता प्रसन्न शेट्टीने सांगितले की, या चित्रपटाच्या आपल्या ध्येयापासून लक्ष विचलित होऊ नये म्हणून, त्याने दोन वर्ष फक्त या प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले.

"दिग्दर्शकाने पहिलीच ओळ सांगितल्याबरोबर मला हा प्रकल्प पटला. चित्रपटाची पहिली ओळ लिहिण्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मी अगदी सुरुवातीपासूनच या चित्रपटात गुंतलो गेलो. या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देण्यासाठी प्रत्येक संवाद लिहिला जात असताना, मी दिग्दर्शक आणि पटकथालेखकासोबत हजर होतो."

आपल्या चित्रपटांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराबाबत स्वतःचे मत व्यक्त करताना संदीप कुमार म्हणाले, "काही विशिष्ट सर्जनशील घटक फक्त ए आय द्वारेच साध्य किंवा निर्माण करता येतात असे नाही. तथापि, सर्वोत्तम उपलब्ध तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माझ्या चित्रपटांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही (एआय चा वापर टाळायचा म्हणून टाळणार नाही), याची मी हमी देतो."

वाढती उत्कंठा आणि हलक्याफुलक्या क्षणांच्या वलयाने सजलेला 'आरारीरारो' हा चित्रपट प्रेक्षकांना आपल्या कथानकाने आणि भावनिक मुल्याने भारावून टाकण्याचे वचन देतो. उपदेश करण्याऐवजी, हा चित्रपट, त्याला जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्या संदेशाचा व्यापक अर्थ लावण्याची मुभा प्रेक्षकांनाच देण्याचा हेतू बाळगतो.

प्रादेशिक चित्रपटांची समृद्धी सर्वांसमोर मांडण्यासाठी, या चित्रपट महोत्सवात भारताच्या विविध भागांतील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काही दिवस खास राखून ठेवण्यात आले आहेत. १२५ मिनिटे लांबीचा 'आरारीरारो' हा चित्रपट, ५४ व्या इफ्फीमध्ये भारतीय पॅनोरमा, फीचर फिल्म्स या विभागा अंतर्गत प्रदर्शित होत आहे. संदीप कुमार हे मुख्यत्वे कन्नड चित्रपट उद्योगातील चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. त्यांचा पहिला चित्रपट 'नंदनवनडोल' (२०१९) होता आणि त्यानंतर 'आरारीरारो' (२०२३) आला आहे. त्यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

कलाकार आणि इतर चित्रपटकर्मी

दिग्दर्शक : संदीप कुमार व्ही

निर्माता : टीएमटी प्रॉडक्शन

लेखक : देवीप्रसाद राय

चित्रीकरण दिग्दर्शक (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी- डीओपी) : मयूर शेट्टी

संकलक : महेश येनमूर

कलाकार: प्रसन्न शेट्टी, जीवा, निरक्षा शेट्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news