

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात साथीच्या आजारांसह संधिवात, त्वचाविकार, अस्थमा, मूत्रपिंड, पोटाशीसंबंधित असे विविध विकार डोके वर काढतात. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये सुसूत्रता असावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. पावसाळ्यात मूत्रपिंडाचे विकार बहुतांश वेळा उद्भवतात. आर्द्रतेच्या पातळीत अचानक होणारा बदल, वातावरणाचा दाब, तापमानात होणारे चढ-उतार, यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि विविध आजारांचा संसर्ग होतो. यासाठी पुरेसे आणि स्वच्छ पाणी पिणे, हंगामी फळांचे सेवन, औषधांमधील नियमितता आणि व्यायाम, यावर भर देणे आवश्यक असते.
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
पावसाळ्यात त्वचा कायम कोरडी ठेवावी. उकळून थंड केलेले पाणी प्यावे. बेरी, लिंबूवर्गीय फळे, पालेभाज्या, टोमॅटो आणि ग्रीन टी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट असलेल्या पदार्थांमुळे त्वचेचे रक्षण होते. व्हिटॅमिन सीमुळे त्वचा ताजीतवानी राहते. साखरयुक्त स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा वापर मर्यादित करा आणि त्याऐवजी नैसर्गिक पदार्थ निवडा. आहारात ग्रीक दही, शेंगा आदींचा समावेश असावा.
– डॉ. सोनाली कोहली, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसांधेदुखीपासून कसे दूर राहाल?
पावसाळ्यात संधिवात किंवा सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांना तीव— वेदना होऊ शकतात. वातावरणातील बॅरोमेट्रिक दाब कमी झाल्यामुळे मऊ ऊतींमध्ये सूज येऊ शकते, ज्यामुळे सांध्यातील द्रवाचा विस्तार होऊ शकतो. सांधेदुखी कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हलके व्यायाम करावेत. स्नायूंच्या कमकुवतपणा आणि कडकपणामुळे वेदना वाढू शकतात.
– डॉ. किरण खरात, ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, रुबी हॉल क्लिनिक