

डायबेटिक रेटिनोपॅथी या गंभीर व्याधीवर वेळीच उपचार केले गेले नाहीत, तर रुग्णाला अंधत्व येऊ शकते. अंधत्वाबरोबरच त्याला मानसिक ताणतणावांनाही तोंड द्यावे लागू शकते. ( Diabetes and Vision Loss ) त्यामुळे नंतर उपचार करण्यापेक्षा ही व्याधी होऊच नये, म्हणून काळजी घेणे सर्वोत्तम.
कोणताही विकार झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून प्रयत्न करणे केव्हाही चांगले. डायबेटिक रेटिनोपॅथीच्या बाबतीतही हे खरे आहे. पण, यात खरे तर मधुमेहच होऊ न देणे अधिक योग्य आहे. म्हणजे मधुमेह नसेल, तर डायबेटिक रेटिनोपॅथीही होणार नाही. पण, प्रत्येकाला मधुमेह टाळणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे मधुमेहाचे निदान झाल्यानंतर डोळ्यांची काळजी घेणे आणि डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ न देणे हाच योग्य मार्ग ठरतो. व्याधीच्या सुरुवातीच्या टप्प्यात रेटिनोपॅथीची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे लक्षणे आढळून येईपर्यंत रेटिनाचे बरेच नुकसान झालेले असू शकते. शिवाय एका टप्प्यानंतर (अॅडव्हान्स्ड् स्टेजमध्ये) डायबेटिक रेटिनोपॅथी हा विकार पूर्णपणे बरा होऊन दृष्टी पुन्हा पूर्ववत होणे शक्य नसल्याने (म्हणजे रेटिनाचे एकदा झालेले नुकसान भरून निघणे शक्य नसल्याने) त्यावर प्रतिबंध हाच प्रभावी उपाय ठरतो. या प्रतिबंधात्मक उपायांमुळे व्याधी ज्या टप्प्यात आहे त्याच टप्प्यात रोखता येते.
मधुमेह जडला असल्याचे निदान झाल्यानंतर प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा नेत्रपटलतज्ज्ञाकडून (रेटिना स्पेशालिस्ट) डोळ्याची संपूर्ण तपासणी करून घ्यायला हवी. कारण बरेचदा डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान होईपर्यंत डोळ्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले असते.त्यामुळे डोळ्यांना व्यवस्थित दिसत असेल तरी मधुमेहींनी डोळ्यांची तपासणी करून घ्यायलाच हवी. डायबेटिक रेटिनोपॅथीची सुरुवात साधारणत: नेत्रपटलाच्या मध्यबिंदूच्या अवतीभोवती होते. त्यामुळे सुरुवातीला दृष्टीमध्ये फरक पडल्याचे रुग्णांना जाणवत नाही; मात्र विकार मध्यबिंदूवर पोहोचतो, तेव्हा भुरकट दिसायला सुरुवात होते. नेत्रपटलाच्या पुढे रक्तस्राव झाल्यास काळे डाग दिसू लागतात. पण, हे दृश्य परिणाम लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. डोळ्यांची नियमित तपासणी केल्यास हे टाळता येते.
या तपासण्यांमध्ये डोळ्यांमध्ये एक विशिष्ट औषध टाकून डोळ्याच्या बाहुलीचा आकार मोठा केला जातो. त्यामुळे रेटिना आणि डोळ्यातील इतर भाग स्पष्ट दिसतात. या तपासणीला फंडोस्कोपी असे म्हणतात. त्यानंतर विशिष्ट मशिनच्या साह्याने 'मेक्युलर एडिमा' आणि 'प्रॉलिफरेटिव्ह डाबेटिक रेटिनोपॅथी'चे परीक्षण केले जाते. दुसर्या एका तपासणीमध्ये 'फ्ल्युरोसीन अँजिओग्राफी' केली जाते. यात हाताच्या रक्तवाहिनीमध्ये एक 'डाय' इंजेक्शनने टोचला जातो. त्यानंतर एका विशिष्ट कॅमेर्याच्या साह्याने रेटिनाची छायाचित्रे (फोटो) घेतली जातात. या छायाचित्रांमुळे रेटिना स्पेशालिस्टना व्याधीच्या प्रसाराबाबत नेमका अंदाज येतो. त्यावरून उपचारांची पुढची दिशा ठरवणे सोपे जाते. 'ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी' या आणखी एका चाचणीत 'मॅक्युलर एडिमा'चे प्रमाण किती आहे हे समजते.
डायबेटिक रेटिनोपॅथी होऊ नये म्हणून काळजी घेणे उत्तमच पण काही कारणांनी डायबेटिक रेटिनोपॅथीचा विकार झाला तर त्यावर तातडीने उपचार करून घ्यावेत. हे उपचार व्याधीची तीव्रता आणि व्याप्ती यावर अवलंबून असतात. वर उल्लेख केलेल्या चाचण्यांवरून व्याधीची व्याप्ती आणि प्रसार याची माहिती मिळू शकते. सौम्य प्रकारात डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करण्याची गरज नसते. प्रसाराचे परीक्षण करण्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे असते. रक्तातील साखरेचे प्रमाण आणि रक्तदाब यावर नियंत्रण ठेवले तर ही व्याधी होण्याची शक्यता बरीच कमी होते किंवा टाळताही येते.
व्याधीच्या सुरुवातीच्या काळात नेत्रपटलावर सूज असताना डोळ्याच्या आत एक विशिष्ट इंजेक्शन देऊन उपचार केले जातात आणि लेसर किरणांद्वारे सूज कमी केली जाते. यात रुग्णाला काहीही वेदना होत नाहीत आणि उपचारानंतर घरी जाता येते. इंजेक्शन दिल्यानंतर दर महिन्याला ओसीटी या मशिनद्वारे तपासणी करून नेत्रपटलाच्या सूजेची चढ-उतार पाहिली जाते. सुजेचे प्रमाण अधिक असल्यास किंवा केशवाहिन्यांचे जाळे तयार झाल्यास लेसर किरणांचा वापर करून व्याधीवर नियंत्रण मिळवले जाते. अधिक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया करून दृष्टी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.
डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे केवळ दृष्टीवरच परिणाम होतो असे नाही; तर रुग्णाला दैनंदिन कामे करण्यातही अडचणी जाणवतात. त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो आणि त्याला एकप्रकारचा न्यूनगंड येऊ शकतो. एका आकडेवारीनुसार 2013 मध्ये जगात एकूण लोकसंख्येच्या 8.3 टक्के म्हणजे 382 दशलक्ष लोकांना डायबाटिक रेटिनोपॅथीची लागण झालेली होती. त्याच पाहणीतील अंदाजानुसार ही संख्या 2035 मध्ये 55 टक्के म्हणजेच 592 दशलक्ष एवढी असेल.
भारताचा विचार करायचा तर 2035 मध्ये ही संख्या 109 दशलक्ष एवढी असेल असा अंदाज आहे. यातील काही टक्के मधुमेहींनाच डायबेटिक रेटिनोपॅथी होतो असे मानले तरी ती संख्याही डोळे पांढरे करणारी आहे. जगाच्या टक्केवारीच्या तुलनेत भारतीयांना डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका अधिक आहे. हा अंदाज अतिरंजित मानला तरी एकूण आकडेवारी धोकादायक आहे. हे कटू भाकीत टाळायचे असेल, तर वेळीच सावध होऊन या व्याधीबद्दल जनजागृती व्हायला हवी. त्यामुळे मधुमेहींनी नेत्रतपासणी आणि उपचार याबाबत टाळाटाळ न करणेच श्रेयस्कर.