

उमरगा : धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ऊर्जा केंद्र असलेले बडे नेते तथा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी राजीनामा देऊन मंगळवारी (दि.२७) रोजी सायंकाळी मुंबई येथे भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाल्याने आत्ता जिल्ह्यातील काँग्रेसला कोण तारणार ही मोठी चिंता काँग्रेसच्या निष्ठावंताना लागली आहे. Dharashiv Politics
गेली अनेक वर्षापासून धाराशिव जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा अभेद्य गड म्हणून ओळखला जायचा. मात्र, राजकारणातील वरिष्ठ नेत्याच्या कुरघोड्यामुळे पक्षाला ग्रहण लागले आहे. अंतर्गत कलह आणि एक दुसऱ्याला पाण्यात पाहण्याने बालेकिल्याचे बुरुज ढासळू लागले आहेत. त्यातच घराणेशाहीमुळे दुसरे सत्ताकेंद्र निर्माण होऊ दिले नाही. 'काँग्रेस का हात आम आदमी के साथ' ही केवळ घोषणा राहिली. गेली अनेक वर्षे सत्ता असताना जिल्ह्यातील दुसरे नेतृत्व निर्माण झाले नाही. आत्ता काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. मराठवाड्यातील नांदेडचे मोठे नेते नवीन पक्षात जाऊन खासदारकी मिळविली आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असो सत्ताधीश आम्हीच हे समीकरण राजकीय घराणे शाहीत रूढ झाले आहे. Dharashiv Politics
संघर्ष करून सत्ता हस्तगत करण्याची मानसिकता नेत्यांची राहिली नाही. लोकशाही प्रधान देशात विरोधी पक्ष जेवढा सक्षम तेवढी लोकशाही भक्कम पण सध्या विरोधकांना गिळंकृत केले जात असल्याने धर्मनिरपेक्षतेच्या बाता मारणारे कट्टर हिंदुत्ववाद्यांशी हातमिळवणी करीत आहेत. धाराशिव जिल्ह्यात याआधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी आणि आत्ता काँग्रेसचे बडे नेते भाजपाच्या गळाला लागले आहेत. आगामी काळात काँग्रेसचे काय होणार ? हा महत्वाचा प्रश्न निष्ठावंत काँग्रेस जणांना पडला आहे. ग्रामीण भागातील सामान्य जनता आजही काँग्रेस पक्षाला मोठ्या आशेने पाहत आहे. ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात काँगेसचे चांगले बस्तान आहे. मात्र, सध्या बसवराज पाटील हे भाजपच्या कमळाला भुलले असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात एकहाती सत्ता केंद्र स्थापन करणारे डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्याचे सुपुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपात दाखल होऊन आमदार झाले. या आधी उमरगा मतदारसंघ हा लातूर लोकसभेला जोडला होता. या तालुक्यातील मतदारांनी प्रचंड मताधिक्य देऊन लातूरचे शिवराज पाटील – चाकूरकर यांना केंद्रात पाठविले. सात वेळा त्यांनी लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. त्यांचे मानसपुत्र म्हणून राज्यात नाव लौकिक मिळविलेले बसवराज पाटील आज भाजपात दाखल झाले. एके काळी त्याचे अंतर्गत स्पर्धक असलेले डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील आधीच भाजपवासी झाल्याने आता बसवराज पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील एकत्र काम करणार का की पुन्हा एकमेकाला पाण्यात पहाणार? कोण कोणाला नेता मानणार? जिल्ह्यातील जनता कोणाला नेता म्हणून स्वीकारणार ? असे विविध प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.
हेही वाचा