

धाराशिव – उमरगा तालुक्यातील माडज येथील तरुणाच्या मृत्यूनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने आज उमरगा बंदची हाक दिली आहे. सकाळपासून संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर बंदच्या पार्श्वभूमीवर उमरगा आगारातून एक बस स्थानकात लावण्यात आली नाही. बंद दरम्यान महामंडळ बसचे नुकसान होवू नये, म्हणून सकाळ पासून सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे उमरगा आगार प्रशासनाने सांगितले.
दरम्यान बस वाहतूक बंद असल्याने खासगी वाहतूकदारांनी प्रवास भाड्यात दुपटीने वाढ करत प्रवासी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. तर काल शहरातील मुख्य मार्गावरील अशोक चौकात रात्री आठच्या सुमारास संतप्त जमावाने घोषणाबाजी देत रास्ता रोको आंदोलन केले. जमावाने रस्त्यावर टायर पेटवून देत सरकार विरोधात घोषणाबाजी दिली. आज उमरगा बंद दरम्यान कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून उमरगा पोलिसांनी सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.