

भोपाळ : सूक्ष्मजीवांशी मनुष्य जीवनाचा अतूट संबंध आहे. रोगकारक सूक्ष्मजीव आपल्याला आजारी पाडत असतात; पण काही सूक्ष्मजीव हे आपल्या जगण्याला आधारही देत असतात. अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना 'मायक्रोबायोम' असे म्हटले जाते. ते आपली पचनसंस्था, चयापचय क्रिया आणि रोगप्रतिकारकशक्तीत मोलाचे योगदान देतात. असे सूक्ष्मजीव आपल्या शरीराचाच एक भाग बनलेले असतात व त्यांच्याशिवाय आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालू शकत नाही. असे सूक्ष्मजीव आतड्यांमध्ये कसे कार्य करतात हे दर्शवणारे एक उपकरण आता भारतीय संशोधकांनी विकसित केले आहे.
मानवी आतड्यात मायक्रोबायोमच्या एक हजारपेक्षाही अधिक प्रजाती एकत्रितपणे राहतात. आतड्यांमध्ये हे सूक्ष्मजीव अन्नाच्या पचनासाठी एन्झाईम्स सोडत असतात. ते शरीराला विभिन्न मेटाबोलाईट प्रदान करतात जे शरीराच्या आंतरिक कार्यप्रणालीला योग्य पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक आहे. भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान 'आयआयएसईआर' भोपाळमधील संशोधकांनी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर आधारित एक नवे उपकरण विकसित केले आहे ज्याच्या सहाय्याने हे समजू शकेल की सूक्ष्मजीव आतड्यात विविध प्रकारचे भोजन तसेच औषधांचे चयापचय कसे करतात.
'गटबग' नावाचे हे उपकरण मानवी आतड्यांद्वारे पाचन व पोषक तत्त्वांचे शोषण अशा क्रियांमध्ये समाविष्ट विशिष्ट जीवाणू एन्झाईम्स, प्रतिक्रिया आणि जीवाणूंबाबतची माहिती देते. तोंडावाटे घेतलेली औषधे तसेच भोजनाच्या अणूंमधील चयापचय क्रियेत भूमिका बजावणार्या सूक्ष्मजीवांची ओळख करण्यासाठी हे उपकरण उपयुक्त आहे. संशोधकांनी म्हटले आहे की आतड्यातील जीवाणूंची संख्या ही मानवी शरीरातील पेशींपेक्षाही अधिक आहे. आतड्यातील जीवाणू हे माणसाला अतिरिक्त चयापचय क्षमता देत असते.