

पुणे, पुढारी, वृत्तसेवा: "छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्यरक्षक आहेत. पण त्यांना धर्मवीर न म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे. त्यांच्यावरील हा अन्याय आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी लढले. ते धर्मवीर आहेतच, त्यांना ते धर्मवीर नाहीत म्हणणे हा द्रोहच", असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर यावरून वाद सुरू असून तो रस्त्यावर आल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "या देशामध्ये एकच जाणते राजे आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणाला त्यांच्या नेत्यांना जाणता राजा म्हणायचे असेल तर म्हणू द्या. जनता म्हणणार नाही." खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करताना पातळी सोडू नये, असे आवाहन केले. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, "सुप्रिया सुळेंनी जे म्हटलंय त्याचे मी स्वागत करतो. पण सुप्रिया सुळेंनी जे मत मांडलय ते आधी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐकले पाहिजे. खालच्या पातळीवर जाऊन टीका राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते सोशल मीडियावर करत असतात. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे समर्थन करतोच, आम्ही देखील असेच आवाहन करू." असेही फडणवीस म्हणाले.
मुंबई आणि महाराष्ट्राची ताकद बघा. देशात कुणालाही उद्योग आपल्याकडे आकृष्ट करायचे असतील किंवा औद्योगिक समेट करायची असेल तर त्यांना मुंबईत आल्याशिवाय पर्याय नाही, ही आपली ताकद आहे. कुणीही कुणाचे उद्योग पळवून घेऊ जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातील उद्योग तर कुणीच पळवून घेऊ जाऊ शकत नाही. प्रत्येक राज्याची आपआपली एक ताकद असते. त्या-त्या ठिकाणचा भूगोल असतो, नैसर्गिक फायदे असतात. तसे त्या ठिकाणी उद्योग जात असतात. गुजरात आणि राजस्थानचा विचार केला तर वाळवंटामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता आहे. सोलर पॅनलसाठी जमीन उपलब्ध असल्याने ग्रीन हायड्रोजनसारखे उद्योग तिकडे जात आहेत. कुणीही कितीही बोलले तरी शेवटी भारताची आर्थिक राजधानी ही मुंबईच असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.