

पनवेल: पुढारी वृत्तसेवा: मुंबई कोणाच्या बापाची नसून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिम्मत नाही. आम्ही मुंबई कोणालाही तोडू देणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला फटकारले. तसेच महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हक्काकरिता आम्हीच लढणार असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकले. मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावर अनेक वर्षे राजकारण करणाऱ्या शिवसेनेवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. शिवाय आता मुळ शिवसेना आमच्याकडे आली असून, उरलेली शिवसेना अल्पसंख्यांक असल्याचा टोलाही लगावला.पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आज (दि.२३) आयोजित भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज एक गड जिंकल्यावर कधी शांत बसले नाहीत. पुढच्या गडाकडे ते मार्गक्रमण करत राहिले. आता राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले असले तरी आपल्यालाही पुढील उद्दिष्टे गाठायची आहेत, अशा शब्दांत त्यांनी मुंबई महापालिकासह राज्यातील १४ महानगरपालिका,२५ जिल्हा परिषदा आणि ९२ नगरपंचायतींच्या आगामी निवडणुका हेच भाजपाचे लक्ष असल्याचे पदाधिकाऱ्यांसमाेर (Devendra Fadnavis) स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सत्तेकरीता परिवर्तन झालेले नसून, राज्यातील जनतेच्या हितासाठी झाले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवून मुख्यमंत्री केले आहे. भाजप सत्तापिपासू पक्ष नाही. सत्तेसाठी हा पक्ष इतर राज्यातील सरकार पाडत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने आमच्याशी बेइमानी केली नसती तर आजच्यासारखी अवस्था झाली नसती. राष्ट्रवादीशी जवळीक साधत शिवसेनेने आजच्या परिस्थितीचे बीजारोपण निवडणूक निकालाच्या आधीपासूनच केले होते, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
एकीकडे भ्रष्टाचार करायचा, दुसरीकडे सूड उगवायला, असा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकारने सुरू केला होता. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन करण्यात आल्याचे फडणवीस यांनी बैठकीच्या कार्यकारिणीत सांगितले. घराबाहेर पाऊल ठेवले तरी केसेस व्हायच्या. 'मेरी हिंमत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कही तुफानो को मोड चुका हुँ मैं' अशी शेरोशायरी फडणवीस यांनी सादर करताच सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.
फडणवीस म्हणाले, सत्ता हे आपले साधन आहे. सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. हा सत्तेचा गड जिंकलो आहोत. विकासाच्या यात्रेत गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र मागे पडला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र विकासाच्या वाटचालीत आणायचा आहे. राज्याला देशात पहिला क्रमांकावर आणायचे आहे. हा गड जिंकायचा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यानिमित्ताने मी एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करेन. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा सरकारमधून बाहेर पडला. परंतु ते बाहेर पडले तेव्हा ठरले नव्हतं की सरकार येईलच. आणि असे घडले नसते तर त्यांचे सामाजिक, राजकीय जीवन समाप्त करण्यात आले असते. पण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. त्यांनी ठरवले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या विचारांशी जर फारकत घेतली जात असेल, ज्यांच्याशी लढा केला त्यांच्या अधिपत्याखाली काम करावे लागत असेल, ज्यांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जावे लागत असेल, सावरकरांचा अपमान रोज सहन करायचा, दाऊदशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो, त्याच्याविरोधात बोलता येत नव्हते. बाळासाहेबांचा शिवसैनिक हे सहन करू शकत नव्हता. हे परिवर्तन सत्तेसाठी नाही विचारांसाठी आहे. राज्यासाठी हे आवश्यक होते.
हेही वाचलंत का ?