दातांनी दिलेले सिग्नल कसे ओळखायचे?

दातांनी दिलेले सिग्नल कसे ओळखायचे?
Published on
Updated on

रात्रीतून अचानक दातातून कळा येऊ लागल्या की, डॉक्टरांकडे जाणारे अनेकजण असतात. तोपर्यंत दातांच्या समस्यांकडे गांभीर्याने न पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर एकतर महागडी ट्रिटमेंट घेऊन त्यावर उपचार करावे लागतात किंवा दात गमवावे लागतात; पण दातांनी दिलेले काही सिग्नल योग्य वेळेत पकडले, तर दात वाचवता येतात.

दातांची समस्या निर्माण झाली, तर घरगुती उपचार करून ती वेळ मारून नेण्याकडे अनेकांचा कल असतो. डॉक्टरांची पायरी शक्यतो न चढण्याचा अनेकांचा कल असतो; पण दातांच्या बाबतीत हे फार धोकादायक ठरू शकतं. दातातील फरक सूक्ष्मपणे पाहिला, तर त्यातून कितीतरी सिग्नल आपल्याला मोठं दुखणं येण्याआधीच मिळालेले असतात. दातांनी दिलेले हे सिग्नल कसे ओळखायचे?

दातांवर काळे डाग पडू लागले आणि ते ब्रश करूनही जात नसतील तर दात किडलेले असू शकतात. त्यासाठी वरवरचा उपचार न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळीच उपचार केले नाहीत, तर ही कीड हिरड्या आणि अन्य दातांना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे दातदुखी वाढते. गरम किंवा गार पदार्थ खाण्याने दातात दुखत असेल, तर हादेखील दातांनी दिलेला एक सिग्नल म्हणायला हवा. दात किंवा जबड्यात असे पदार्थ खाऊन कळा येत असतील, तर लगेच डॉक्टरांना भेटले पाहिजे. त्याकडे लक्ष दिले नाही, तर ही सूज हिरड्यांत पसरू शकते. हिरड्या किंवा दातातून ब्रश करताना किंवा फ्लॉस करताना रक्त येत असेल, तरी डेन्टिस्टला भेट द्यायला हवी. त्यातून पुढे जाऊन दातदुखी आणि हिरड्या सुजण्याचा धोका कमी होऊ शकतो. दातात सूज दिसणे, दातांची रचना बदललेली असणे, दातांवर डाग दिसणे किंवा दातांत फटी पडणे अशी कोणतीही गोष्ट लक्षात आली, तर ताबडतोब दातांच्या डॉक्टरकडे जायला हवे.

काहीवेळा दातांवर काही सर्जरी केलेली असते किंवा दातांचा आकार बदलण्यासाठी त्यांना काही चाप लावलेले असतात. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झाला, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं. दातांची स्वच्छता चांगली नसेल, तर तोंडात घरे पडण्यापासून ते हिरड्यांना सूज येण्यापर्यंत अनेक त्रास होऊ शकतात. वेळीच दात साफ करणे आणि योग्य वेळी ते काढून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दात चांगले असतील, तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे दातांच्या आरोग्याकडे लक्ष दिलेच पाहिजे.

डॉ. निखिल देशमुख, दंतवैद्यक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news