ICC Player of The Month : दीप्ती शर्मा, पॅट कमिन्स ठरले आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ!

ICC Player of The Month : दीप्ती शर्मा, पॅट कमिन्स ठरले आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Player Of The Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ने मंगळवारी डिसेंबर 2023 साठी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराच्या विजेत्याची घोषणा केली. यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने महिला गटात बाजी मारली. तिने जेमिमाह रॉड्रिग्ज आणि प्रेशियस मरांज यांना मागे टाकून हा पुरस्कार पटकावला. दीप्ती ही आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ ठरलेली दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे. तिच्या आधी, हा पराक्रम भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (ऑक्टोबर 2022) हिने केला होता.

इंग्लंड-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत दमदार कामगिरी (ICC Player Of The Month)

दीप्तीने गेल्या महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 165 धावा वसूल केल्या. तसेच गोलंदाजीतही 10.81 च्या सरासरीने 11 बळी घेतले. तसेच या कालावधीत, महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने 3 सामन्यांच्या दोन डावात 15 धावा केल्या आणि 2 बळी घेतले. तर एकदिवसीय फॉर्मेटमध्ये तिने 2 सामन्यांमध्ये 45.00 च्या सरासरीने धावा केल्या आणि 6 विकेट्स देखील घेतल्या.

इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या दोन्ही डावांत दीप्तीने 9 (पहिल्या डावात 5, दुसऱ्या डावात 4) विकेट्स घेतल्या. एवढेच नाही तर तिने 67 धावांची खेळी देखील केली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतही दीप्तीने 8 फलंदाजांची शिकार केली. तसेच फलंदाजीत 78 धावांचे योगदान दिले. याशिवाय कांगारूंविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत दीप्तीने नाबाद 24 धावा केल्या आणि पाच बळी घेतले. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 8 बाद 258 धावांत रोखण्यात भारतीय संघाला यश आले. मात्र, भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नाही. भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 1-2 ने गमावली.

सन्मानाची गोष्ट : दीप्ती (ICC Player Of The Month)

'डिसेंबर महिन्यातील उत्कृष्ट आयसीसी महिला खेळाडू म्हणून निवड होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. गेल्या महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्ध मी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करू शकले याचा मला आनंद आहे. भविष्यात भारतीय संघासाठी अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी मी कठोर परिश्रम घेत राहीन.'

पॅट कमिन्सची पुरुष गटात बाजी

त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पुरुष गटात आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ ठरला. तैजुल इस्लाम (बांगलादेश) आणि ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड) यांना मागे टाकत त्याने कारकिर्दीत प्रथमच हा पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार जिंकणारा तो तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. त्यांच्या आधी ट्रॅव्हिस हेडला नोव्हेंबरमध्ये हा पुरस्कार मिळाला होता. तर डेव्हिड वॉर्नरने नोव्हेंबर 2021 मध्ये हा पुरस्कार जिंकला.

पॅट कमिन्सने नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत 19 विकेट घेतल्या. त्याने मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुस-या कसोटीच्या दोन्ही डावात 5-5 विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. त्याच सामन्यात त्याने 250 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला. या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर तर सिडनी येथील तिसऱ्या कसोटीतही त्याने पाच बळी घेतले. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला. मालिकेतील अप्रतिम कामगिरीसाठी कमिन्सला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्णधार म्हणून कमिन्ससाठी 2023 हे वर्ष संस्मरणीय ठरले. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिका जिंकली, तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह आयसीसी वनडे विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले. (ICC Player Of The Month)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news