

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी तसेच इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, असा आशावाद शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेचा मनोज जरांगे यांनी फेरविचार करावा, असे आवाहनही केसरकर यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचे अभिवचन दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा व खुल्या प्रवर्गातील इतर घटकांचे व्यापक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अंदाजे 3 कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे, असे ते म्हणाले.