

वॉशिंग्टन : उतारवयात होणार्या मेंदूच्या दुर्धर आजारांमध्ये डिमेन्शिया, अल्झायमर्स यांचा समावेश आहे. विस्मरणाशी संबंधित अशा या आजारांवर रामबाण औषध नाही. मात्र, हे आजार कोणत्या मार्गाने टाळता येऊ शकतात याबाबत सातत्याने संशोधन होत असते. आता संशोधकांनी म्हटले आहे की उतारवयात रोज गाढ झोप घेतल्याने डिमेन्शियाला अटकाव निर्माण होतो.
एका संशोधनानुसार वयाच्या साठीनंतर दरवर्षी गाढ झोपेत 1 टक्का घट आल्याने डिमेन्शिया होण्याचा धोका 27 टक्क्यांनी अधिक वाढतो. झोपेच्या दर्जात सुधारणा केल्याने किंवा गाढ झोप घेणे सुरू ठेवल्याने उतारवयात डिमेन्शिया होण्याचा धोका कमी होतो. मोनाश स्कूल ऑफ सायकॉलॉजिकल सायन्सेस आणि ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न येथील टर्नर इन्स्टिट्यूट फॉर ब्रेन अँड मेंटल हेल्थमधील मॅथ्यू पेस यांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
'जामा न्यूरॉलॉजी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वयाची साठी ओलांडलेल्या 346 लोकांची यासाठी पाहणी करण्यात आली. त्यांची ढोप व मेंदूची स्थिती याबाबतचा दोन टप्प्यांमध्ये अभ्यास करण्यात आला. सतरा वर्षांच्या पाहणीनंतर डिमेन्शियाचे 52 रुग्ण आढळून आले. त्यावरून संशोधकांनी याबाबतचे निष्कर्ष काढले.