

सिडनी, वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दुय्यम दर्जाचा कमकुवत संघ पाठवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वचषक विजेता कर्णधर आणि दिगज खेळाडू स्टिव्ह वॉ (steve waugh) याने संताप व्यक्त केला असून, अशाने कसोटी क्रिकेट संपून जाईल, अशी चिंताही त्याने व्यक्त केली आहे. 'आयसीसी'ने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्याने केली असून, यप्रकरणी त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला काही प्रश्नदेखील विचारले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने सध्या आपले लक्ष १० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० कडे बळवले आहे. टी-२० विश्वचषक जवळ आल्याने प्रोटीज संघाने खेळाच्या सर्वात लहान स्वरूपाकडे आपले लक्ष वळवले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेची ही वृत्ती स्टिव्ह वॉ याला अजिबात आवडली नाही. न्यूझीलंडने आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळू नये, असे वॉ ने (steve waugh) त्याचे मत व्यक्त केले आहे. याशिवाय 'आयसीसी'ने यात हस्तक्षेप करावा, अशी त्याने विनंती केली आहे. दोन कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात नील ब्रैडला कार्णधार बनवण्यात आले आहे, तर ७ अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'शी बोलताना स्टिव्ह वॉ म्हणाला, जर 'आयसीसी' किंवा इतर कोणीतरी या घटनेवर लवकर कारवाई केली नाही, तर कसोटी क्रिकेट हे इतिहास जमा होऊन जाईल. कारण, तुम्ही सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध स्वतःची परीक्षा घेत नाही. मला समजले की, मुख्य खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर येत नाहीत. त्यांना योग्य मोबदला मिळत नाही का? नेमके काय आहे यामागील कारण, आफ्रिकन बोर्डाने हे स्पष्ट करावे.
कसोटी क्रिकेट ही काळाची गरज असून, लोकांना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तो पुढे म्हणाला, श्रीमंत क्रिकेट बोर्डाने याबाबत काहीतरी नियम करणे गरजेचे आहे. वॉ पुढे म्हणाला, मला समजत नाही की 'आयसीसी' किंवा जे मोठे देश भरपूर पैसे कमवत आहेत, त्यांच्याकडे कसोटी सामन्यांसाठी नियमन शुल्क का नाही. जे एक प्रीमियम क्रिकेट बोर्ड आहेत त्यांनी यावर आवाज उठवणे गरजेचे आहे.