सांगलीत ‘डान्सबार’ सुरू; पंधरा बारबालांची ‘छमछम’

सांगलीत ‘डान्सबार’ सुरू; पंधरा बारबालांची ‘छमछम’
Published on
Updated on

सांगली ः  राज्यातील 'डान्सबार'वर बंदी आल्यानंतर बेरोजगार बारबालांनी सांगलीकडे मोर्चा वळविल्याने 'छमछम करता है ये नशिला बदन…' यांसारख्या गाण्यांवर आता येथे ठेका धरला जात आहे. अनेक बारबालांनी काही वर्षे ऑर्केस्ट्रा व तमाशाचे फड रंगवले. याच बारबालांना आता काही परमिट रूम व बिअरबार चालकांनी नृत्याचे काम दिले आहे. त्यांनी एकप्रकारे 'डान्सबार'च सुरू केला आहे. सांगलीत कोल्हापूर रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी नव्याने 'डान्सबार ' सुरू झाला आहे. या बारमध्ये सध्या 15 बारबाला थिरकतात.

हजार भरल्यानंतरच 'एन्ट्री'!

कोल्हापूर रस्त्यावर विष्णुअण्णा फळ मार्केट परिसरात काही महिन्यांपूर्वी नव्याने परमिट रूम बिअरबार सुरू झाला. तो काहीसा अडगळीच्या मार्गावर आहे. फारशी ग्राहकांची गर्दी नसायची. लाखो रुपये खर्च करून बार काढल्याने मालक चिंतेत पडला. बार जोमात सुरू राहावा, यासाठी त्याने परराज्यातील नृत्यागणांशी (बारबाला) संपर्क साधला. एक हजार रुपये दिल्याशिवाय ग्राहकांना बारमध्ये 'एन्ट्री' नाही. या एक हजारात तुम्ही केवळ दारू प्यायची.

'डीजे'च्या तालावर ठेका!

दारू पिताना 'डीजे'च्या तालावर बारबालांचे नृत्य सुरू असते. 'तुम्हाला दारूचा प्रत्येक पेगही त्या भरून देण्यासाठी येतात. अनेक धनदांडगे ग्राहक या बारबालांवर नोटांचा वर्षावही करीत आहेत.

शनिवारी, रविवारी गर्दी!

शनिवारी आणि रविवारी हा बार जोमात असतो. शासकीय सुट्टी असल्याने अनेकांची हजेरी हमखासच. या बारबाला परराज्यातील आहेत. त्यांच्या राहण्याची सोय शहर परिसरात आहे. मोठा हॉल आहे. विजेवरील आकर्षक रोषणाई सुरू असते. ग्राहक आत गेला की, दरवाजे बंद करून घेतले जातात. एक हजाराच्या 'एन्ट्री'मध्ये दारूचे बिल सहाशे रुपये झाले, तर हॉटेल मालक उर्वरित चारशे रुपये परत देत नाही. रात्री एक ते दीडपर्यंत 'छमछम' सुरू असते. शासकीय यंत्रणेला या 'डान्सबार'ची माहिती नसावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. सांगली शहर, ग्रामीण पोलिस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची गस्त सुरू असते, तरीही त्यांना खबर नसावी?

मिरजेत महिला वेटरकडून सर्व्हिस…

मिरजेत एका परमिट रूम बिअरबारमध्ये महिला वेटरकडून ग्राहकांना सर्व्हिस दिली जातेे. यापूर्वी सांगली, मिरजेत महिलांकडून सर्व्हिस देण्याचे असे प्रकार घडले होते. पोलिसांनी छापा टाकला होता. पण यासाठी हॉटेल मालकाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निष्पन्न झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news