Dance Bar in Mumbai: मीरारोड परिसरात पहाटेपर्यंत चालते छमछम ! हताश नागरिकांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Dance Bar in Mumbai
Dance Bar in Mumbai
Published on
Updated on

मुंबई : पुढारी टीम; ठोस पुराव्यांसह दाखल तक्रारी दाबत नियमबाह्य नाईट लाईफ सुरू ठेवण्याचा चंग मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने बांधलेला दिसतो. या पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मुंबई- गुजरात महामार्गावरील केम छो, नाईट लव्हर्स, नाईट सीटी आदी २५हून अधिक अवैध डान्सवारमध्ये भर दुपारी सुरू झालेली छमछम रात्र उलटून पहाट सुरू झाली तरी सुरू राहते. 'हील एन सी' सारख्या रेस्तरामध्ये तर रात्र देखील पुरत नाही. सुर्योदयापर्यंत ग्राहकांची खातीरदारी हुक्का, लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारबालांसह अन्य सेवांनी इथे होताना दिसते. (Dance Bar in Mumbai)

अनेक जागरूक नागरिकांनी पुढारीकडे या छमछमचे व्हिडीओ आणि छायाचित्रे पाठवली. एवढेच नव्हे तर पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारींच्या प्रतीही त्यांनी पुढारीला दिल्या. या तक्रारींचही शहानिशा करण्यासाठी पुढारी टीमने आठवडाभर या भागाची रात्रीची सफर केली. मध्यरात्री रस्त्यांवरून गस्त घालणारे, विनाकारण रेंगाळणाऱ्यांची धरपकड करणारे पोलिसांचे एकही वाहन नजरेस पडले नाही. शौकीन ग्राहकांची गर्दी गुजरात महामार्गाच्या दुतर्फा ओळीने असलेल्या अवैध डान्सवार, लॉज, हील एन सी, सागर, समाधानसारख्या हॉटेलांबाहेर पहाटेपर्यंत काळोख पाहून ग्राहक माघारी फिरू नये यासाठी बार कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या खाणाखुणाही पाहिल्या. बारच्या कडेकोट भिंतीआड वाजणारे कर्कश संगीत थेट रस्त्यावर ऐकू येते. पहाटेच्या सुमारास घरी परतणाऱ्या ग्राहकांसोबत २५ ते ३० बारवालाही बारमधून बाहेर पडताना दिसल्या. हे सर्व पोलिसांना का नाही दिसत? असा प्रश्न इथले नागरिक, जबाबदार पालक विचारतात. (Dance Bar in Mumbai)

एका तक्रारदाराने तर पोलिसांकडून डान्सबारवर कारवाई होणार नाही याची खात्री पटल्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीत हफ्ता म्हणून पोलिसांना मिळणारी रक्कम देखील नमूद आहे, काही डान्सबारमधील चीत्रफितीही पुरावा म्हणून या तक्रारीसोबत जोडल्या आहेत. (Dance Bar in Mumbai)

Dance Bar in Mumbai: डान्सबार नंतरचा अड्डा

मीरारोडचे डान्सबार बंद झाले की ग्राहक आणि बारबलांचे पाय वळतात घोडबंदर गावानजीक महामार्गावरील हील एन सी हॉटेल मध्ये. मध्यरात्री तीन नंतरच येथे ग्राहकांची रेलचेल वाढते. तळमजल्यावर लाईव्ह ऑर्केस्ट्रा क्युबिकल आसनव्यवस्था तर दुसन्या मजल्यावर वातानुकूलित हॉलमध्ये मंद प्रकाशातील हुक्याच्या धुराची वलये, माहोल नेहमीचाच. या हॉटेलमधूनच डान्स रेंगाळताना दिसली. प्रवेशद्वारावरील मिट्ट बार सिंडिकेट आपली सूत्रे हालवते. येथे ग्राहकांची रेलचेल सुरू ठेवण्याची जबाबदारी मीरारोडच्या बारबाला पार पाडतात.

पुन्हा परवाना कसा?

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दाखल तक्रारीनुसार गेल्यावर्षी आयुक्तपदी सदानंद दाते असताना महामार्गावरील मॅडनेस या बारवर कारवाई झाली होती. इतक्यावरच न थांबता दाते यांनी मिरा भाईंदर महापिलकेला पत्रव्यवहार करून या बारची इमारत अवैध असल्यास कारवाई करावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेने या बारची इमारत जमीनदोस्त केली. मात्र काहीच महिन्यात येथे नवी इमारत उभी राहिली आणि त्यात केम छो नावाचा डान्सबार सुरू झाला. या बारला माहापलिका, पोलिसांनी परवाना कसा दिला, असा सवाल आता या तक्रारीद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर उत्तर मात्र मिळालेले नाही.

परिमंडळ १ मधील काशिमीरा, नया नगर, मीरारोड आणि नवघर या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ४५ अवैध डान्सबार आहेत. महामार्गावरील बार प्रामुख्याने काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोडतात. त्यात केम छो, संगीत, नाईट लव्हर, बॉसी, मिलेनियम २०००, मंत्रा, मॅट्रिक्स, नाईट सिटी, नशा, मेला आदी बार मोडतात.

विना रोकटोक अहोरात्र धंदा सुरू असल्याने महामार्गावरील अवैध डान्सबार चा रोजचा गल्ला सुमारे २५ ते ३० लाखांमध्ये होतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील केम छो, नाईट लव्हर अशा बारचा गल्ला ४० ते ५० लाखांचा टप्पाही ओलांडतो. शुक्रवार, शनिवारची रात्र ग्राहकांची गर्दी तुलनेने जास्त असते. याशिवाय दसऱ्यानंतर डान्सबारचा सिझन सुरू झाल्याची ग्वाही बार चालक देतात.

बार चालक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत ठरवून दिलेली रक्कम सिंडिकेटकडे जमा करतात. त्यानुसार सिंडिकेट कडे दरमहा समारे दीड ते दोन कोटी रुपये जमा होतात, अशी माहिती पोलिस दल आणि बार व्यवसायातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news