

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काही वर्षांपूर्वीपर्यंत ठरावीक श्रीमंत वर्गापुरती मर्यादित असलेली पर्यटनाची क्रेझ आता समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत पोहोचली आहे. नोकरदार, व्यावसायिकांबरोबरच व्यापारी, शेतकरी, कामगारवर्गदेखील त्यांची आवड आणि आर्थिक क्षमतेनुसार देशाटनासाठी सवड काढताना दिसत आहे. या बदलत्या ट्रेंडची दखल घेत दैनिक 'पुढारी'च्या वतीने वेगवेगळ्या टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी तसेच पर्यटकांना एकत्र आणणारे 'अ हेवन हॉलिडे' प्रस्तुत दै. 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन-2023' पॉवर्ड बाय गगन टूर्स हे पर्यटनविषयक प्रदर्शन कोल्हापूर आणि सांगली येथे आयोजित केले आहे.
व्ही. टी. पाटील स्मृती सभागृह कोल्हापूर येथे 19, 20 आणि 21 ऑगस्ट रोजी आणि कच्छी समाज भवन राम मंदिर चौक सांगली येथे 25,26 आणि 27 ऑगस्ट रोजी हे प्रदर्शन होणार आहे. दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल करणार्या या उद्योगाच्या वाढीला प्रचंड वाव असून पर्यटनास चालना देण्यासाठी आणि या उद्योगात सहभागी उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोव्हिड महामारीनंतर जागतिक पर्यटन क्षेत्र खुले झाले आहे. लोकांच्या सवयी बदलत आहेत. या उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ, आयसीटी ट्रेनिंग याचा वापर केला जात आहे. विमान नाईट लँडिंग, रेल्वे, रस्त्यांचे जाळे या प्रकारच्या सुविधांमुळे देश-विदेशात पर्यटनास खूप वाव निर्माण झाला आहे.
टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांसोबतच रिसॉर्टस्, वीकेंड पिकनिक स्पॉटस्, देशांतर्गत आणि देशाबाहेरील विमान प्रवास, कौटुंबिक सहली आयोजक कंपन्या यांची मागणी वाढत असून पर्यटक नेहमीच चांगले पर्याय शोधत असतात. अशा प्रकारच्या व्यावसायिकांना एका ठिकाणी व्यासपीठ मिळवून देणारे हे प्रदर्शन आहे.
लोकांमध्ये देश-विदेशातील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा ट्रेंड वाढत आहे. पर्यटनाला जाऊ इच्छिणारे पर्यटक आणि विविध प्रकारच्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील टूर आयोजित करणार्या ट्रॅव्हल मॅनेजमेंट कंपन्या यांना एकत्र आणण्यासाठी हे प्रदर्शन एक सुवर्णसंधी ठरणार आहे. ट्रॅव्हल कंपन्यांनी आयोजित केलेल्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील टूर्स पॅकेजीस, सवलतीच्या ऑफर अशी सर्व माहिती ग्राहकांना एकाच छताखाली एकाच ठिकाणी मिळणार आहे. या प्रदर्शनास तरुणवर्ग, मध्यवर्ग, उच्च मध्यमवर्ग, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला उपस्थित राहणार असून पर्यटन उद्योगातील कंपन्यांना आपल्या संभाव्य ग्राहकांशी संपर्क करण्याची ही चांगली संधी असणार आहे. या संधीचा अधिकाधिक व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.