अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या कालावधीत ८० टक्के वाढ

अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या कालावधीत ८० टक्के वाढ
Published on
Updated on

अलिबाग; जयंत धुळप :  गेल्या चार दशकांमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळांच्या कालावधीत ८० टक्के वाढ झाली आहे तर अतिशय तीव्र चक्रीवादळांचा कालावधी २६० टक्क्यांने वाढला आहे, अशी नोंद २०२१च्या अभ्यासानुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी नोंदविली असल्याची माहिती रत्नागिरी शासकीय मत्स्य महाविद्यालयाच्या सागरी जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दैनिक ''पुढारी'ला दिली.

६ जून रोजी चक्रीवादळ बनलेले बिपरजॉय सुमारे १० दिवस अरबी समुद्रात चक्रीवादळ म्हणून अस्तित्वात राहिल्यानंतर सौराष्ट्र-कच्छ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे अलीकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारे सर्वात दीर्घकाळ टिकणारे चक्रीवादळ बनले आहे. ग्लोबल वार्मिंगच्या प्रभावाखाली अरबी समुद्रावरील चक्रीवादळे अधिक वारंवार आणि तीव्र होत असल्याचे नोंदवले गेले आहे, असे डॉ. मोहिते यांनी पुढे सांगीतले.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिणामामुळे अरबी समुद्रात लाटांची निर्मीती वेगाने होत आहे. त्याचे प्रत्यक्ष अनूभव रत्नागिरी जिल्ह्य गणपतीपुळे, रायगडमध्ये मुरुड व अलिबाग आणि मुंबईत जुहू समुद्रकिनारी आले आहेत. या सागरी लाटांच्या निर्मीतीच्या प्रक्रीये सदर्भात शास्त्रीय माहिती देताना डॉ. मोहिती म्हणाल्या, चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे समुद्रात केवळ प्रवाह निर्माण होत नाहीत, तर लाटा निर्माण होतात. समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर वारा वाहत असताना, हवा आणि पाणी यांच्यातील घर्षण किंवा ड्रॅगमुळे पाण्याचा पृष्ठभाग ताणला जातो. त्यामुळे लाटा तयार होतात आणि समुद्राचा पृष्ठभाग रफ होतो. यामुळे वाऱ्याला पाण्याच्या पृष्ठभागावर पकड घेणे आणि लाटा तीव्र करणे सोपे होते. वाऱ्यामुळे तयार होणाऱ्या मोठ्या लाटा तीन गोष्टींवर अवलंबून असतात.

यामध्ये पहिला भाग म्हणजे वाऱ्याची ताकद हा आहे. वाऱ्यातील ऊर्जा हस्तांतरित होण्यासाठी वारा, लाटांच्या क्रेस्ट म्हणजे उंचवट्यापेक्षा वेगाने वाहणारा असावा लागतो. दुसरा भाग म्हमजे वाऱ्याचा कालावधी हा आहे. मोठ्या लटा निर्माण करण्यासाठी वारा प्रदीर्घ काळ वाहत राहावा लागतो. आणि तीसरा भाग म्हणजे फेच हा आहे, यात वाऱ्याची दिशा न बदलता कापलेले अखंड अंतर महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.

वारा सुरू झाल्याने वाढते लाटांची उंची

चक्रीवादळाचा वारा सुरू झाल्याने लाटांची उंची हळूहळू वाढत जाते आणि तरंगांची लांबी, कालावधी दोन्ही वाढत जातात. जसजसा वारा चालू राहतो किंवा दमगार (स्ट्रॉंग) होतो तसतसे पाणी प्रथम व्हाईट कॅप्स म्हणजे फेसाळ बनत जाते आणि शेवटी लाटा फुटू लागतात. खोल सागरात या लाटा चक्रीवादळाच्या ऊर्जेमुळे तयार होतात. पूर्ण विकसित समुद्रातील अशा लाटा, त्यांना निर्माण करणाऱ्या वादळाला मागे टाकतात, प्रक्रियेत त्यांची उंची लांबते आणि कमी होते. यांना स्वेल वेव्हज असे म्हटले जाते. या लाटा जितक्या लांब असतील तितक्या वेगाने त्या प्रवास करतात. लाटा किनाऱ्याजवळ आल्यानंतर, तेथील तळाच्या उंचसखलतेमुळे त्यांच्या प्रवासाची दिशा बदलू शकते. खोल पाण्यात त्यांची उंची कित्येक पटीने वाढते. किनाऱ्यावरील समुद्राचा तळ उथळ असेल तर लाट अधिक मजबूत बनते आणि शेवटी या लाटा स्टॉर्म सर्ज म्हणून किनाऱ्यावर फुटतात, असे डॉ. मोहिते यांनी अखेरीस सांगीतले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news